अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे प्रबळ दावेदार असेलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका महिलेने बलात्कारचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकी अब्जाधीश जेफ्री एप्सटाइन यांनी १९९४ साली मी १३ वर्षांची असताना माझे लैंगिक शोषण केले होते, असा दावा त्या महिलेने केला आहे, तर ट्रम्प यांनी महिलेचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. मात्र, महिलेच्या या खळबळजनक आरोपांमुळे ट्रम्प यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.
केट जॉन्सन या महिलेने कॅलिफोर्नियातील कोर्टात डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात १० कोटी डॉलर्सचा खटला दाखल केला आहे. पैसा आणि मॉडेलिंगचे आमीष दाखवून ट्रम्प आणि एप्सटाइन यांनी आपली फसवणूक केल्याचा आरोप केट जॉन्सनने केला आहे. याशिवाय, एप्सटाइन यांच्या घरी आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीला मला बोलाविण्यात आले होते. तिथे डोनाल्ड ट्रम्प देखील उपस्थित होते. यावेळी दोघांनी मिळवून माझ्यावर बलात्कार केला होता, असे या महिलेने म्हटले आहे. याशिवाय, या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही ट्रम्प यांनी दिली होती, असेही तिने पुढे सांगितले.