अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी वाढत्या धोक्यांवर चर्चा केली. दोन्ही देशांनी उत्तर कोरियाविरोधात एकमेकांना सहकार्य करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्यातील चर्चा उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बची चाचणी आधी झाली की नंतर हे समजू शकलेले नाही. उत्तर कोरियाने केलेली अण्वस्त्र चाचणी निषेधार्ह असून त्यांच्या या कृत्यांमुळे आमच्या देशाला धोका निर्माण झाला आहे, असे जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांनी सांगितले. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

उत्तर कोरियाने सहावी अणुचाचणी केल्यानंतर दोन्ही नेत्यात चर्चा झाली असून हायड्रोजन बॉम्बची चाचणी अचूक झाल्याचे उत्तर कोरियाने म्हटले होते. दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रावर अण्वस्त्रे ठेवून उत्तर कोरिया अमेरिकेतही हल्ला करू शकतो. सध्या सुरू असलेले प्रयत्न वाढवून उत्तर कोरियावर दडपण वाढवण्याचे ट्रम्प व अ‍ॅबे यांनी ठरवले आहे, असे व्हाइट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे. आठवडाभरात दोन्ही नेत्यांचा तिसऱ्यांदा संवाद झाला आहे.

दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा ही अणुचाचणीनंतरची आहे की आधीची हे अजून स्पष्ट झालेले नाही. उत्तर कोरियाच्या धोक्याविरोधात अमेरिका, जपान व दक्षिण कोरिया यांच्यात सखोल सहकार्य राहील याचा ट्रम्प व अ‍ॅबे यांनी पुनरुच्चार केल्याचे व्हाइट हाऊसने म्हटले असून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतही तिन्ही देश एकजुटीने उत्तर कोरिया विरोधात मोहीम सुरू ठेवतील असे ट्रम्प यांनी सांगितले.

अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन यांच्याशीही संवाद साधून उत्तर कोरियाने वातावरण अस्थिर करण्याची जी कृत्ये चालवली आहेत त्यावर समन्वयाने प्रतिसाद देण्याचे ठरवले आहे.

चीनकडून तीव्र निषेध

बीजिंग : उत्तर कोरियाने केलेल्या सहाव्या अणुचाचणीचा चीनने तीव्र निषेध केला असून त्या देशाने ही गैरकृत्ये थांबवावीत व कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त करण्यासाठी संवादाच्या पातळीवर यावे असे म्हटले आहे. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी यशस्वी केल्याचा दावा केला असून हे अण्वस्त्र आंतरखंडीय क्षेपणास्त्रावर लावता येते.

ल्ल चीन हा उत्तर कोरियाचा मुख्य राजनैतिक मित्र आहे त्यामुळे चीनने केलेल्या टीकेला महत्त्व आहे. उत्तर कोरियाला समजावून सांगण्याची जबाबदारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टाकली होती. कोरियन द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त असावा व अण्वस्त्रप्रसारबंदीचे पालन व्हावे हीच चीनची भूमिका आहे.  उत्तर कोरियाच्या अणुचाचणीला आंतरराष्ट्रीय समुदायाचा विरोध असून चीन सरकारचाही त्याचा निषेध करीत आहे. त्या देशाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या ठरावांचे पालन करून अण्वस्त्रांच्या चाचण्या करण्याची गैरकृत्ये थांबवावीत तसेच संवादाच्या पातळीवर यावे.

ठोस प्रतिसाद द्यावा- फ्रान्स

पॅरिस : उत्तर कोरियाने केलेल्या अणुचाचणीला आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळीच ठोस प्रतिसाद देण्याची गरज असल्याचे मत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी व्यक्त केले आहे. कोरियन द्वीपकल्पात प्रक्षोभक स्थिती निर्माण झाली असून उत्तर कोरियाने बिनशर्त चर्चेसाठी तयार व्हावे व अण्वस्त्र तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने खंबीर आणि ठाम भूमिका घ्यावी असे मॅक्रॉन म्हणाले.

..हा उद्दामपणाच- रशिया

मॉस्को : उत्तर कोरियाने केलेल्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचणीवर रशियाने जोरदार टीका करतानाच शांततेचे आवाहन केले आहे. उत्तर कोरियाने हायड्रोजन बॉम्बची चाचणी करून संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळ ठरावांचे तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करण्याचा उद्दामपणा केल्याचे म्हटले आहे.  उत्तर कोरियाच्या नेतृत्वाने गंभीर धोका निर्माण केला आहे व त्यांनी असेच चालू ठेवले तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. आताच्या घडामोडीत शांतात पाळणे व तणावाचे वातावरण आणखी चिघळणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.