जगातील इतर कुठल्याही देशांच्या तुलनेत भारतात बरीच पर्यटन स्थळे आहेत. मात्र, येथील अस्वच्छतेमुळे पर्यटक या ठिकाणांपासून दूर राहतात, असे केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. शाळा स्वच्छ ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित पुरस्कार सोहळ्याला जावडेकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलत होते. सुलभ इंटरनॅशनल या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी १२० विद्यार्थ्यांना पुरस्काराने गौरवण्यात आले.

जावडेकर म्हणाले, इतर देशांपेक्षा आपल्याकडे जास्त पर्य़टनस्थळे आहेत. संपूर्ण भारतात वर्षभरात जेवढे पर्यटक येतात त्यापेक्षा दहापट पर्यटक एकट्या पॅरिसमध्ये येतात. यामागील प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडील पर्यटनस्थळे ही अस्वच्छ असतात. परदेशातील भारतीयांचा दाखला देताना ते म्हणाले, भारतीय लोक सिंगापूरमध्ये असले की, रस्त्यावर कचरा करु शकत नाहीत. मात्र, तेच लोक जेव्हा भारतात असतात तेव्हा केळ्याचे साल किंवा चॉकलेटचा कागद रस्त्यावर फेकताना कोणताच विचार करत नाहीत.

यावेळी जावडेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना स्वच्छतेचा वसा घेण्याचे आवाहन केले. तसेच नाममात्र दरात सुलभ शौचालये चालवणाऱ्या बिंदेश्वर पाठक यांचे कौतुक केले. स्वच्छतेच्यादृष्टीने विचार केल्यास ते क्रांतिकारी कार्य करत असल्याचे जावडेकर म्हणाले. सुलभ शौचालयाची सुविधा ही १९७० पासून बिहारमधून सुरु करण्यात आली होती. जी अद्यापही सुरु आहे.

स्वच्छ भारत कार्यक्रमांतर्गत देशभरातील शाळांमध्ये एका वर्षात साडेचार लाख स्वच्छतागृहे बांधण्यात आली. यामुळे शाळांमधील मुलींचे प्रमाण वाढल्याचे जावडेकर यांनी सांगितले. देशभरातील सुलभ स्कूल सॅनिटेशन क्लबमध्ये ६ हजार ५०० विद्यार्थांनी सहभाग घेतला असून यामध्ये २००पेक्षा अधिक शाळा सदस्य झाल्या आहेत.