२८ कॉप्टिक ख्रिश्चनांचा बळी घेणाऱ्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इजिप्तच्या लष्कराने लिबियातील दहशतवादी गटांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. दहशतवाद्यांना आश्रय किंवा प्रशिक्षण देणाऱ्या कुठल्याही तळांवर हल्ले करण्यास आपला देश मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांनी दिला आहे.

लष्कराचे विमान उड्डाण करत असल्याच्या फूटेजसह एक व्हिडीओ क्लिप आपल्या अधिकृत फेसबुक व ट्विटर पेजेसवर टाकून इजिप्शियन लष्कराचे प्रवक्ते तामेर अल-रेफे यांनी या प्रत्युत्तर हल्ल्याची घोषण केली.

लिबियातील दहशतवादी तळांवर सहा हवाई हल्ले करण्यात आल्याचे वृत्त सरकारी दूरचित्रवाहिनीने दिले. लिबियाच्या पूर्वेकडील देरना या शहरातील प्रशिक्षण तळांना यात लक्ष्य करण्यात आले. याच दहशतवाद्यांनी हल्ल्यात भाग घेतल्याची निश्चित माहिती मिळवल्यानंतर हे हल्ले करण्यात आले.

बुरखे घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी कैरोच्या दक्षिणेला २५० किलोमीटर अंतरावर मिन्या प्रांतात कॉप्टिक ख्रिश्चनांना घेऊन जाणाऱ्या बसवर शुक्रवारी हल्ला केला होता. यात २८ ख्रिस्ती लोक ठार, तर २३ जण जखमी झाले होते.

दहशतवादी घटकांना आश्रय किंवा प्रशिक्षण देणाऱ्या कुठल्याही तळावर हल्ला करण्यात इजिप्त मागेपुढे पाहणार नाही, मग असा तळ देशात असो किंवा देशाबाहेर, असे अध्यक्ष सिसी यांनी दूरचित्रवाहिनीवरील भाषणात सांगितले. शुक्रवारचा हल्ला आम्ही इतक्या सहजतेने घेणार नाही, याचीही त्यांनी जाणीव करून दिली. दहशतवादविरोधी लढय़ात त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही सहकार्याचे आवाहन केले.

दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या सर्व देशांबाबत कुठलीही दया न दाखवता किंवा सलोख्याची भावना न ठेवता त्यांना शिक्षा द्यायला हवी, असे मत सिसी यांनी व्यक्त केले.

हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली

इजिप्तमध्ये बसवर हल्ला करून कॉप्टिक ख्रिश्चन समुदायाच्या २९ लोकांचा बळी घेणाऱ्या भीषण हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. देशातील अल्पसंख्याक समुदायावर अवघ्या दोन महिन्यांच्या काळात झालेला हा दुसरा मोठा हल्ला होता. आपल्या एका शाखेने शुक्रवारी या बसला लक्ष्य केल्याचे सांगतानाच, या हल्ल्यात ३२ लोक ठार झाल्याचे आयसिसचा प्रचार करणाऱ्या ‘अमाक’ या वृत्तसंस्थेवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात संघटनेने म्हटले आहे.