फेसबुकचा ‘सम्राट’ मार्क झुकरबर्ग आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचा ‘सम्राट’ होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे समजते. झुकरबर्गने राजकारणात उडी घेण्याचा इरादा स्वतः व्यक्त केला नसला तरी, राजकीय आखाड्यात उतरून २०२४ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक लढण्याची शक्यता त्याच्या अगदी जवळच्या मित्रांनी वर्तवली आहे. झुकरबर्ग हा राजकारणासाठी अतिशय योग्य आहे. त्याच्यात चांगले नेतृत्वगूण आहेत, असेही त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे.

गेल्या काही वर्षांत झुकरबर्ग याने अतिशय सावधपणे आपली खास प्रतिमा तयार केली आहे. त्यामुळे झुकरबर्ग स्वतः राजकारणात प्रवेश करण्यासाठी तयारी करत आहे, असे यावरून दिसते. कदाचित २०२४ मध्ये अमेरिकेतील अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे, असे त्याच्या मित्रांनी एका वृत्तपत्राजवळ बोलताना सांगितले. ‘मेल ऑनलाइन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, स्वतः झुकरबर्गने राजकारणात जाण्यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण २०२४ मध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी होणारी निवडणूक तो लढू शकतो, असे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. या निवडणुकीवेळी झुकरबर्ग ४० वर्षांचा होईल. अमेरिकेच्या प्रत्येक राज्यात जाण्याचा संकल्प यावर्षी झुकरबर्ग याने केला होता. २०१७ मध्ये माझ्यासमोर खूप मोठे आव्हान असेल. अमेरिकेच्या प्रत्येक राज्याचा दौरा आणि तेथील लोकांशी संवाद साधायचा आहे, असे त्याने संकल्पात म्हटले होते. मी यापूर्वी काही राज्यांचे दौरे केले आहेत. आता यावर्षीचा माझा संकल्प पूर्ण करायचा असल्याने मला अमेरिकेतील ३० राज्यांचा दौरा करावा लागणार आहे, असे त्याने म्हटले होते. तेथील लोकांचे जीवनमान, ते करत असलेले काम आणि भविष्यात त्यांच्या असलेल्या अपेक्षा याबाबत जाणून घेणार असल्याचेही त्याने सांगितले होते.

अलिकडेच झुकरबर्गने राष्ट्रपती ओबामा यांच्या वरिष्ठ सल्लागारांपैकी एक असलेल्या व्यक्तीची आपल्या ‘चान झुकरबर्ग’ या उपक्रमात निवड केली होती. हा सामाजिक उपक्रम असून झुकरबर्गची पत्नी तो राबवत आहे. अलिकड़ेच अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उघडपणे कोणतेही मत व्यक्त केले नव्हते. पण निवडणूक निकालानंतर अमेरिकेत चांगल्या बदलाची अपेक्षा त्याने अप्रत्यक्षपणे व्यक्त केली होती.