जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्लांनी सोमवारी वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे. आपण हुरियत कॉन्फरन्सच्या विरोधात नसून काश्मिरी जनतेच्या अधिकारासाठी मी स्वातंत्र्याचे समर्थन करतो, असे त्यांनी म्हटले आहे. या वेळी त्यांनी हुरियतच्या नेत्यांना आंदोलन चालु ठेवण्याचे आवाहन करत आपण जोपर्यंत एकत्रित येणार नाही तोपर्यंत स्वतंत्र होऊ शकत नाही. मी नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो, असेही त्यांनी या वेळी म्हटले.
अब्दुल्ला यांनी आपले वडील आणि पक्षाचे संस्थापक शेख मोहम्मद अब्दुल्ला यांच्या १११व्या जयंतीनिमित्त हजरतबल येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, ही आग आता कधी विझणार नाही. ते (नवी दिल्ली) तुम्हाला काहीच देणार नाहीत. तुम्हाला आपल्या हक्कासाठी हा संघर्ष सुरूच ठेवावा लागेल. आम्ही या आंदोलनासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले आहे.

हुरियत नेत्यांना उद्देशून ते म्हणाले, आम्ही तुमच्या आंदोलनाचा भाग आहोत. आम्हाला विरोधी समजू नका. आम्ही जिहादची लढाई लढली आहे. संघटीत राहा आणि हे आंदोलन पुढे घेऊन चला. आम्ही तुमच्याबरोबर आहोत.
याचवेळी त्यांनी हुरियतला योग्य मार्गावर चालण्याचा सल्लाही दिला. जोपर्यंत तुम्ही योग्य मार्गावरून चालला आहात. तोपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत. फक्त तुम्हीच (हुरियत नेता) या राज्याला योग्य मार्गावरून घेऊन जाऊ शकता, असेही त्यांनी या वेळी म्हटले.
आमचा पक्ष कधीच चुकीच्या मार्गावरून जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी या वेळी बोलून दाखवला. जम्मू काश्मीरमधील राजकीय स्थिरता देईल आणि येथील लोकांच्या अडचणी कमी करेल त्यांना आमचे समर्थन राहिल, असे नॅशनल कॉन्फरन्सच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे म्हटले आहे.

[jwplayer ThsYZE9m-1o30kmL6]