फर्गसन येथील निषेध मोर्चात कृष्णवर्णीय मुलावर गोळीबार करणाऱ्या गोऱ्या पोलिसाला निर्दोष घोषित केल्यावरून अमेरिकेतील बहुतांश भागांत बुधवारी निषेध मोर्चाची धार अधिकच वाढली. या वेळी संतप्त आंदोलकांना थोपवण्यासाठी या भागांत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमवारी अमेरिकेतील न्यायालयाने हा निर्णय दिला होता. त्यानंतर काही तासांतच फर्गसन येथील रस्त्यांवर आंदोलकांनी निषेध मोर्चा काढला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी बळाचा वापर केला. याचा प्रतिकार करताना आंदोलकांमध्ये हिंसक कारवायांचा वापर केला.  
ऑगस्ट झालेल्या एका निषेध मोर्चात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात निशस्त्र कृष्णवर्णीय मुलाचा मृत्यू झाला होता.
सेंट लुईस भागांत बुधवारी आंदोलकांनी काही इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. तर काहींनी पोलिसांची वाहने पेटवून दिली. आंदोलकांना थोपवणे कठीण झाल्याने पोलिसांनी त्यांच्या दिशेने अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. यावर आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगड, बाटल्या आणि सिमेंटच्या फरशा फेकल्याची माहिती सेंट लुईस पोलिसांनी दिली. आंदोलकांचा संताप इतक्या टोकाला गेला होता की काहींनी बाटल्यांमध्ये मूत्र भरून त्या पोलिसांच्या दिशेने फेकल्या, असे पोलीस अधिकारी जॉन बेल्मर यांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत ४४ जणांना अटक करण्यात आली आहे, परंतु सोमवारी रात्रीपेक्षा बुधवारी झालेला हिंसाचार खूपच कमी होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.