३१ गावे बुडाली, माल्दामध्ये २२ हजार जण बाधित

माल्दा जिल्ह्य़ातील फुल्लरा नदीच्या पुरात ३१ हून अधिक गावे बुडाली असून त्यामुळे २२ हजार नागरिक बाधित झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या पुराचा सर्वाधिक तडाखा हरिश्चंद्रपूर ब्लॉक २, रातुआ ब्लॉक १ आणि कालिचक ब्लॉक १ यांना बसला आहे. बीरनगरजवळच्या फरक्का बंधाऱ्याजवळ गंगा नदीचे पाणी घुसल्याने या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

बाधित नागरिकांसाठी तीन निवारालये उभारण्यात आली असून त्यांना अन्नाची पाकिटे पुरविण्यात येत आहेत. बंधारा दुरुस्त करण्याचे काम अहोरात्र सुरू आहे, असे एडीएम कांचन चौधरी यांनी सांगितले. सरकारतोला, मेइनतोला आणि चिनाबाजारला गंगा नदीच्या पुराचा जोरदार फटका बसला असून १०० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

 

बिहारमध्ये २६ लाख नागरिकांना पुराचा तडाखा

पीटीआय, पाटणा

बिहारमध्ये पुराने थैमान घातले असून अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. या पुरामुळे २६.१९ लाख जण बाधित झाले आहेत.

बागमती, कमलाबालन, कोसी, महानंदा आणि जवा नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहात आहेत. पूर्व चंपारण आणि मुझफ्फरपूर या आणखी दोन जिल्ह्य़ांना शनिवारी पूरग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले.

या पुराच्या पाण्यामुळे १.८६ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झाले असून ३.३९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे, इतकेच नव्हे तर जवळपास ४.८१ लाख लोक विस्थापित झाले आहेत, राज्य सरकारने बाधितांवर उपचार करण्यासाठी ११२ वैद्यकीय पथके तैनात केली आहेत.