पृथ्वी तसेच मानवी जीवनाच्या उत्पत्तीबाबत मांडण्यात आलेले ‘उत्क्रांतीवाद’ आणि ‘बिग बँग’ हे सिद्धान्त खरे आहेत. देव म्हणजे कोणी जादूगार नव्हे की आपल्या हातातील जादूच्या छडीने त्याने हे जग निर्माण केले असावे, अशी स्पष्ट कबुली ख्रिस्ती धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी दिली आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीसंदर्भात तथाकथित ‘निर्मितीवाद’ अथवा ‘देवाची बुद्धिमान रचना’ अशा आशयाच्या सिद्धान्तांचा पुरस्कार याआधीच्या धर्मगुरुंनी केला होता. तो सारा प्रकार पोप फ्रान्सिस यांच्या या कबुलीमुळे आता कायमचा थांबेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘पॉन्टिफिकल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस’समोर भाषण करताना पोप फ्रान्सिस यांनी ही कबुली दिली. देवाने मानवांची निर्मिती केली आणि मग त्यांना त्यांच्या अंतर्गत कायद्यानुसार हे जग विकसित करण्याची मुभा दिली. विश्वाची सुरुवात एका प्रचंड स्फोटानंतर (बिग बँग) झाली, असे आज आपण मानतो. या संकल्पनेचा दैवी निर्मात्याच्या हस्तक्षेपाच्या (देवाच्या हस्तक्षेपाच्या) सिद्धान्ताशी कोणताही विरोधाभास नाही. उलट हा सिद्धान्त त्या संकल्पनेस पूरक आहे, अशी स्पष्ट मल्लिनाथी पोप फ्रान्सिस यांनी या वेळी केली.

‘उत्क्रांतीवाद’ आणि ‘बिग बँग’ हे पृथ्वीच्या उत्पत्तीसंदर्भातील सिद्धान्त खरे आहेत. ‘सृष्टीचा निर्माता’ या संकल्पनेशी हे दोन्ही सिद्धान्त सुसंगत आहेत. देव म्हणजे हाती जादूची छडी असणारा कोणी जादूगार आहे. आणि त्याला काहीही करणे शक्य आहे, अशी आपली समजूत असते. पण परिस्थिती तशी नाही. – पौप फ्रान्सिस