केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने दिवाळीच्या तोंडावर खुशखबर दिली आहे. कॅबिनेटने गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ केली आहे. हा बदल १ जुलै २०१६ पासून लागू होणार आहे. याचा ५० लाख कर्मचारी आणि ५८ लाख निवृत्तीधारकांना लाभ होणार आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता १२५ वरून १२७ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अर्थ मंत्रालयाने महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव ठेवला होता. केंद्रीय कॅबिनेटने गुरूवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिली.
कॅबिनेटने २ टक्क्यांनी महागाई भत्त्यामध्ये वाढ केली असली तरी कर्मचारी संघटनांनी ३ टक्क्यांची मागणी केली होती. वस्तूंच्या किंमतीत होणाऱ्या वाढीचा उत्पन्नावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना महागाई भत्ता दिला जातो. याचवर्षी मोदी सरकारने होळीच्या मुहूर्तावर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्क्यांची वाढ केली होती.
यापूर्वी सप्टेंबर २०१५ मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्या ११३ टक्क्यांवरून ११९ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती.