आपण अनेकदा मोटारीत असताना किंवा वाहनावर असताना हवे ते ठिकाण शोधण्यासाठी जीपीएसचा वापर करीत असतो, पण ही सुविधा वापरण्यामुळे मेंदूतील एक भाग बंद होतो जो प्रत्यक्षात गंतव्याच्या विविध मार्गाचे सादृश्यीकरण करीत असतो. त्यामुळे मेंदूची नैसर्गिक क्षमता कमी होते असा याचा दुसरा अर्थ आहे. नवीन संशोधनानुसार जीपीएसचा अतिरेकी वापर हा अशा प्रकारे मेंदूच्या नैसर्गिक क्षमतांना कमकुवत करणारा आहे.

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी मध्य लंडनमध्ये दिशाशोधन करणाऱ्या २४ स्वयंसेवकांवर हा प्रयोग केला त्यात त्यांच्या मेंदूचे स्कॅनिंगही करण्यात आले होते. या संशोधनात असे दिसून आले की, आपल्या मेंदूचा जो भाग स्मृती व दिशाशोधनाचे काम करतो किंवा नियोजन व निर्णय घेण्याचे काम करतो त्या प्रिफ्रंटल कॉर्टेक्स भागाच्या नैसर्गिक क्षमतेवर परिणाम होतो. किंबहुना त्याच्या काही क्षमता बंद होतात. लंडनच्या रस्त्यांच्या जाळ्याला मेंदूतील भाग कसे प्रतिसाद देतात याचा अभ्यास करण्यात आला. जेव्हा स्वयंसेवक हे मानवी पातळीवर मार्ग शोधत होते तेव्हा ते नवीन भागात गेल्यानंतर हिप्पोकॅम्पस, प्रिफ्रंटल कॉर्टेक्स या भागात सक्रियता दिसली. जेव्हा पर्यायी रस्त्यांची संख्या वाढली तेव्हा त्यांची सक्रियता जास्त  वाढली पण जेव्हा त्यांनी सॅटनॅव्ह ही उपग्रहआधारित दिशादर्शन प्रणाली वापरण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या मेंदूतील सक्रियता कमी झाली. जेव्हा रस्त्यांच्या अनेक पर्यायातून मार्ग निवडायचा असतो तेव्हा हिप्पोकॅम्पस व प्रिफ्रंटल कॉर्टेक्स काम करते, असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे ह्य़ुगो स्पायर्स यांनी सांगितले.

संभाव्य शक्य मार्गाचे सादृश्यीकरण हिप्पोकॅम्पस करीत असते व कोणत्या मार्गाने आपण योग्य ठिकाणी पोहोचू हे प्रिफ्रंटल कॉर्टेक्स हा भाग ठरवत असतो. आता आपल्याकडे कोणत्या दिशेने जायचे हे ठरवण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञान आहे, पण ते वापरताना मेंदूत ही क्रिया नैसर्गिक पद्धतीने काम करणारे भाग बंद होतात त्यांच्यात सक्रियता राहता नाही. मेंदूला रस्ते निवडण्याच्या कामात स्वारस्य रहात नाही, असे त्यांनी सांगितले.

आधीच्या संशोधनानुसार लंडनच्या टॅक्सीचालकांच्या मेंदूचा हिप्पोकॅम्पस हा भाग रस्ते व संबंधित खुणा लक्षात ठेवताना प्रसरण पावतो. नवीन संशोधनानुसार उपग्रह दिशादर्शन प्रणाली वापरताना हिप्पोकॅम्पस हा भाग निष्क्रिय होतो व शहरातील रस्त्यांचे जाळे नैसर्गिकरीत्या समजून घेण्याची क्षमता मेंदू गमावून बसतो. जर्नल नेचर कम्युनिकेशन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.