पुढील वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मोटारी व लहान वाहनांना येत्या १५ ऑगस्टपासून टोलमाफी देण्याची घोषणा गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी शनिवारी केली. ‘१५ ऑगस्टपासून गुजरातमध्ये मोटारी व लहान वाहने यांना टोल भरण्यातून सूट देण्यात आली आहे हे जाहीर करण्यास मला आनंद वाटतो’, असे ट्वीट पटेल यांनी केले.

मध्यमवर्गीय लोक त्यांच्या मोटारींमधून कामासाठी जातात, त्या वेळी त्यांना टोल नाक्यांवर १००-१५० रुपये खर्च करावे लागतात. त्यांना टोल भरण्यातून सूट देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मोठय़ा वाहनांना मात्र टोल भरावा लागेल, असे वलसाड जिल्ह्य़ातील एका खेडय़ात वृक्षारोपण मोहिमेच्या वेळी भाषण करतानाही आनंदीबेन पटेल यांनी सांगितले.