सीमा सुरक्षा दलाचा आरोप
जमात-ऊद-दावाचा म्होरक्या हफीज सईद सीमेवरील दहशतवाद्यांच्या तळांना भेटी देऊन त्यांना भारतात हल्ले करण्यासाठी चिथावणी देत असल्याचा आरोप सीमा सुरक्षा दलाने केला आहे. सईद याच्या या कृत्याकडे पाकिस्तान कानडोळा करीत आहे, असेही सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे.
सीमेवरील भागांत हफीज सईद मुक्तपणे फिरत असून दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे आणि त्याला पाकिस्तानचे सुरक्षा रक्षक पाठिंबा देत आहेत, असे सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक राकेश शर्मा यांनी म्हटले आहे.
हफीज सातत्याने दहशतवाद्यांना चिथावणी देत असून अलीकडेच त्याने दहशतवादी तळांवर जाऊन प्रक्षोभक वक्तव्ये केल्याची माहिती मिळाली आहे, असेही शर्मा म्हणाले. सीमेवर दहशतवादी कृत्यांमध्ये वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सीमेवर सियालकोट परिसरातही त्याने गेल्या वर्षी दौरा केला होता. भारतात दहशतवादी हल्ले करण्यासाठी तो युवक आणि दहशतवादी गटांना सातत्याने प्रोत्साहन देत आहे, असेही ते म्हणाले.
पाकिस्तानचे लष्कर आणि सईद यांच्यात लागेबांधे आहेत का, असे विचारले असता शर्मा यांनी सकारात्मक उत्तर दिले. सईद मुक्तपणे फिरत असून त्याबाबत सुरक्षा रक्षक काहीही करीत नाहीत हे पाकिस्तानच्या लष्कराची त्याला फूस असल्याचे द्योतक आहे, असेही ते म्हणाले.