राज्य सरकारने केलेल्या कामांबद्दल आपल्याला काय वाटते, सरकारने ेआणखी कोणती कामे हाती घेतली पाहिजेत, अशी विचारणा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गुरुवारी घरोघरी जाऊन केली. ‘हर घर दस्तक’ हा कार्यक्रम नितीशकुमार यांनी हाती घेतला असून ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात असल्याचे मानले जात आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून नितीशकुमार यांनी पश्चिम दरवाजा येथे १० घरे ठोठावली आणि जनतेशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला. नितीशकुमार यांना उंबरठय़ावर पाहून काही रहिवासी चकित झाले. राज्य सरकारने केलेल्या कामांबद्दल आपण समाधानी आहात का, सरकारने आणखी काय केले पाहिजे, या बाबत नितीशकुमार यांनी घरातील सदस्यांशी चर्चा केली.बडी पाटणदेवी मंदिरात दर्शन घेऊन नितीशकुमार यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि कृष्णा साहू यांच्या घराचा दरवाजा प्रथम ठोठावला.  जद(यू)चे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंह यांनी ‘हर घर दस्तक’ कार्यक्रम आयोजित केला असून पक्षाचा शिस्तप्रिय कार्यकर्ता म्हणून आपण त्यामध्ये सहभागी झालो आहोत. या कार्यक्रमाअंतर्गत एक कोटी घरांमध्ये पोहोचण्याचा मानस आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.