एखाद्या देवळात देवाची मूर्ती चमचाने पाजलेले दूध पितेय, अशा काहीशा घटना घडल्याच्या तुम्ही यापूर्वी ऐकल्या असतील. असं काही कळलं की श्रद्धाळू लोकांची देवाला दूध पाजण्यासाठी झुंबड उडते, असाच काहीसा प्रकार एके ठिकाणी घडला आहे. निमनाबाद आणि आंटा येथून जाणा-या यमुना नदीच्या प्रवाहात दगड तरंगताना सापडले. वैज्ञानिक दृष्ट्या विचार करणा-या काही लोकांना यात विशेष नवल वाटणार नाही. पण या भागात राहणा-या नागरिकांना या गोष्टीची  माहिती मिळताच त्यांनी सदर ठिकाणी प्रचंड केली. लोकांनी या घटनेचा संदर्भ रामायणाशी लावत दगडांची पूजा केल्याचा प्रकार येथे घडला आहे.
निमनाबाद गाव येथील काही शीख लोक नदीत जनावरांना आंघोळ घालत होते. त्यावेळी त्यांना पाण्यात मोठे दगड तरंगताना दिसले. असाच हुबेहुब प्रकार आंटा गावातील लोकांनाही पहावयास मिळाला. त्यामुळे लोकांना आश्चर्याचा धक्का तर बसलाच पण यास त्यांनी दैविक शक्तीमुळे ही घटना घडल्याचे समजत दगडांची पूजा करण्यास सुरुवात केली. कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटीतील भूगर्भ वैज्ञानिक डॉ. अक्षय राजन यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी लावा निघत असतो तेथे हलके दगड आढळतात. जे खूप सहज पाण्यात तरंगतात. पण यमुना नदी ज्या ठिकाणांहून जाते तेथे लावा आढळून येत नाही.