देशात उष्णतेच्या लाटेने एकूण ४३२  बळी घेतले असून मसुरी या थंड हवेच्या ठिकाणीही ३६ अंश तपमानाची नोंद झाली. दक्षिणेकडील आंध्र प्रदेश व तेलंगण राज्यात उष्म्याच्या लाटेने कहर केला १८ मेपासून २४६ जणांचा बळी गेला. आंध्र प्रदेश व तेलंगणात एकूण बळींची संख्या ४३२ झाली आहे.
आंध्रात आतापर्यंत १६२ तर तेलंगणात  १८६ जण मरण पावले आहेत. तपमान नेहमीपेक्षा पाच ते सात अंश सेल्सियसने अधिक आहे. जे मरण पावले ते मजूर असल्याने मनरेगाच्या कामांचे फेरनियोजन करण्यात येत आहे. खम्मम येथे ४८ अंश इतके तपमान होते. विदर्भात लागोपाठ तिसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी ४७ अंश तपमान नोंदले गेले तर दिल्लीत ४४.५ अंश तपमानाची नोंद झाली.
मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश, तेलंगण, बिहार, झारखंड येथे दोन दिवस तपमानातील वाढ कायम राहील. अलाहाबाद येथे ४७ अंश तपमान होते.
तेथील हवामान खात्याचे संचालक जे.पी.गुप्ता यांनी सांगितले, की आद्र्रताही वाढली असून तपमानही वाढत आहे. हल्दवानी येथे ४२ अंश तपमान होते तर सिमला व मनालीत अनुक्रमे २८.६ व २५.८ अंश तपमानाची नोंद झाली आहे. राजस्थानात अनेक ठिकाणी तपमान ४५ अंशांच्या वर आहे. ओडिशात वीज कपातीमुळे लोकांना अडचणी येत असून तेथे  मृतांची संख्या २६ झाली आहे. राजस्थानात जयपूर येथे अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी नाही.

उष्माघाताने दोघांचा मृत्यू?
प्रतिनिधी, कल्याण : गेल्या दोन दिवसांत कल्याण डोंबिवलीत उष्माघाताने दोन जणांचे बळी गेल्याचे समजते. गोग्रासवाडीत राहणाऱ्या शुभांगी खंदारे (५५) यांचा मृतदेह त्या राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर आढळून आला. दोन दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ एका तरुणाचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला होता.  कल्याण रेल्वे स्थानकाजवळ वल्लीपीर रस्त्यालगत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.  उष्माघातानेच हे मृत्यू झाले असण्याचा संशय पोलिसांकडूनही व्यक्त केला जात आहे.