तंत्रज्ञान आणि व्यवसायाची धम्माल सांगड घालत उस्मानाबादच्या एका तरुणाने ‘ओएलएक्स’ च्या माध्यमातून चक्क अंडी विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. अनेकजणांकडून त्याच्या या आगळ्यावेगळ्या व्यवसायाची दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश विभागात या तरुणाने आपला व्यवसाय विस्तारला आहे. ‘ओएलएक्स’ या संकेतस्थळावरुन ‘फोटो काढा.. अपलोड करा… विका…’ या जाहिरातीचा पुरेपूर फायदा उचलत उस्मानाबादच्या सिद्धार्थ नावाच्या या तरुणाने कुतूहलाचा विषय असणाऱ्या ‘कडकनाथ’ प्रजातीच्या कोंबडीचे व तिच्या अंड्यांचे फोटो प्रसिद्ध केले. मुंबईतल्या सेंट्रल कुक्कुट रिसर्च सेंटरमधून या प्रजातीच्या कोंबडीच्या पिल्लांची खरेदी करत त्याने पाच महिन्यांपेक्षा जास्त काळासाठी त्यांचे पालन केले. हल्लीच त्याने या कोंबड्यांच्या अंड्यांचे फोटो ओएलएक्सवर अपलोड करत आपल्या या अनोख्या व्यवसायाला सुरुवात केली. या ‘कडकनाथ’ प्रजातीच्या कोंबडीच्या एका अंड्याची किंमत ५० रुपये इतकी असून संपूर्ण कोंबडीचा दर १४०० रुपये इतका आहे. दिवसेंदिवस होणाऱ्या प्रसिद्धिचा आणि इंटरनेटच्या तंत्रज्ञानाचा फायदाच सिद्धार्थच्या ‘कडकनाथ’ व्यवसायाला होत आहे.