मैत्रीचा हात देतानाच घुसखोरीच्या चीनच्या कुरापती सुरूच आहेत. लेहमधील चुमार, डेमचोक प्रांतात घुसखोरी करणाऱ्या चिनी सैनिकांना हेलिकॉप्टरद्वारे गुरुवारी अन्नाची पाकिटे वाटण्यात आली.
गुरुवारी संधिप्रकाशात भारतीय हद्दीतील तीन चौक्यांवर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) ही आगळीक केल्याची माहिती भारतीय लष्कराच्या प्रवक्त्यांनी दिली.लेहपासून ३०० किलोमीटर पूर्वेस असलेल्या चुमार प्रांतात चीनच्या सुमारे ६०० जवानांनी तंबू ठोकले आहेत. या जवानांना ‘पीएलए’तर्फे नियमितपणे हेलिकॉप्टरद्वारे अन्नपुरवठा केला जात आहे, अशी माहिती लष्करातील सूत्रांनी दिली. स्वाभाविकच गुरुवारच्या मोदी-जिनपिंग भेटीवर या कुरापतीचे सावट राहिले. भारतानेही या भागात आपले लष्कर पाठवले.
चिनी सैन्याची माघार
लडाखमधील चुमार सीमेजवळ चीन लष्कराने केलेल्या घुसखोरीमुळे गेले चार दिवस निर्माण झालेला तणाव आज अखेर चीनने माघार घेतल्याने संपुष्टात आला. रात्री उशिरा चीन सैन्याने स्वत:च्या हद्दीच्या दिशेने माघार घेण्यास सुरुवात केली. चीन सैन्य भारतीय हद्दीत सुमारे ५०० मीटर आत घुसले होते.