जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेची म्हणजेच भारताची स्थिती मानवी विकास निर्देशांकाबाबतीत खूप खालावली आहे. भारताचा मानवी विकास निर्देशांक यादीमध्ये १३१ वा क्रमांक आहे. एका हाताला भारत अर्थव्यवस्थेबाबत अमेरिका, चीन सारख्या मोठ्या देशांसोबत स्पर्धा करत आहे तर मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत भारताची स्थिती पाकिस्तान आणि नेपाळसारखी आहे. जगातील सर्वात वैशिष्ट्यपूर्ण, झपाट्याने वाढणारी आणि लक्षवेधी अर्थव्यवस्था मात्र मानवी विकासाबाबत उदासीन दिसत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षांपासून भारताने मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत काहीच प्रगती केली नसल्याचे दिसत आहे. २०१५मध्ये भारत आणि चीनमध्ये सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली असल्याचे अर्थतज्ज्ञ सांगत आहेत परंतु २०१५ देखील भारताची मानव विकास निर्देशांकाची स्थिती खालवलेली होती असे दिसून आले. २०१४ मध्ये देखील भारताचा या यादीतील क्रमांक १३१ वा होता. गेल्या काही वर्षात यामध्ये काहीच बदल न झाल्याने अद्यापही भारताचा या यादीतील क्रमांक १३१ आहे.

देशातील ६३ टक्के लोक आपल्या स्थितीवर आणि राहणीमानावर समाधानी असल्याचे अहवालात म्हटले आहे. संयुक्त राष्ट्राने तयार केलेल्या या अहवालानुसार भारत हा मानवी विकास निर्देशांकाच्या बाबतीत मध्यम स्तरात येतो. बांग्लादेश, भूटान, पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळ सारखे देशही याच स्तरात येतात. जितका मानव विकास निर्देशांकात आपला क्रमांक कमी तितकी त्या देशाची स्थिती उत्तम असते. भारतीय व्यक्तीचे सरासरी आयुष्यमान ६८.३ वर्षे इतके आहे. या देशात तुम्हाला सुरक्षित वाटते का या प्रश्नाला ६९ टक्के उत्तरार्थींनी हो म्हटले.

उत्तर देणाऱ्या ७२ टक्के महिलांनी आपण समाधानी आहोत असे म्हटले आहे. ६९ टक्के लोकांचा भारताच्या केंद्र सरकारवर विश्वास आहे. तर देशातील ७४ टक्के लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे.  राष्ट्रीय रोजगार हमी योजनेबद्दल सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे विचार काही सकारात्मक नाहीत परंतु या देशातील गरिबांनी ही योजना मात्र आधार वाटते असे अहवालात म्हटले आहे. या योजनेमुळे भारतीय गरिबांच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे असे या अहवालात म्हटले आहे. पायाभूत सुविधाचा विकास करुन जास्तीत जास्त रोजगार निर्माण केल्यास देशातील लोकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण होते असे या अहवालात म्हटले आहे.