जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन मंत्रिमंडळात दीर्घकाळ राहिले असते, तर मी आत्ता जे काम करत आहे, ते त्यांनी ६० वर्षांपूर्वीच केले असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते सोमवारी दिल्लीत सहाव्या आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेत बोलत होते. तत्पूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजनही केले.
दरम्यान, या व्याख्यानमालेत बोलताना मोदी यांनी सरकारची आरक्षणासंदर्भातील भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. वाजपेयी सरकारच्या काळापासून आम्ही कधीच दलित आणि मागासांच्या आरक्षणाला धक्का लागून दिलेला नाही. आत्तादेखील तसे काही घडणार नाही. मात्र, काहीजणांकडून समाजात गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तत्कालीन मंत्रिमंडळात दीर्घकाळ राहिले असते तर मी आत्ता करत असलेले काम त्यांनी ६० वर्षांपूर्वीच केले असते, असे मोदींनी म्हटले. त्यावेळी आंबेडकरांनी मंत्रिमंडळातून राजीनामा का दिला, या इतिहासाचा आपल्याला विसर पडला आहे अथवा त्यापासून आपल्याला जाणूनबुजून अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे. जेव्हा महिलांना समान हक्क देण्याचा मुद्दा आला तेव्हा आंबेडकरांनी महिलांना समान हक्क मिळणार नसतील तर मी मंत्रिमंडळात राहणार नाही, अशी भूमिका घेतल्याची आठवण मोदींनी आपल्या भाषणात करून दिली.
बाबासाहेब आपल्याला १९५६ मध्ये सोडून गेले. मात्र, आज ६० वर्षांनंतर त्यांच्या स्मारकाचा पाया रचला जात आहे. यासाठी साठ वर्षे का लागली, याचे उत्तर कोणाकडेच नाही. कदाचित हे माझ्याच नशीबात लिहिले असावे. बाबासाहेब हे समाजातील दुर्लक्षित घटकांचा आवाज होते. ते अन्यायाच्या प्रत्येक घटनेविरुद्ध आवाज उठवणारे महापुरुष होते. मात्र, आजपर्यंत बाबासाहेबांना फक्त दलितांपुरतेच मर्यादित ठेवून त्यांच्यावर अन्याय केला गेला. ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी राजकीय एकात्मतेसाठी काम केले. तसेच काम बाबासाहेबांनी सामाजिक एकात्मतेसाठी केल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.