दिल्लीच्या ल्यूटन्स झोनमध्ये सध्या घराबाहेरील नावाच्या पितळी पाट्या चोरणाऱ्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांत या भागातील बड्या लष्करी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या घरावरील पाट्या गायब झाल्याने पोलीस हैराण झाले आहेत. १ जानेवारीपासून या चोरट्यांनी लोधी इस्टेट येथील दोन वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांच्या घराबाहेरील पितळी पाट्या चोरल्याच्या तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. नवी दिल्लीच्या जिल्हा पोलिसांनी या चोरट्यांना शोधण्यासाठी काही दिवसांपूर्वीच खास पथके तैनात केली होती. मात्र, तरीदेखील गुरूवारी या चोरट्यांनी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांच्या घरावर डल्ला मारला. पिंकी आनंद यांच्या घरात चोरी होण्याची ही दुसरी वेळ असून यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घरातील एलईडी टीव्ही, अनेक नळ आणि महागडे सूट चोरून नेले.

सूत्रांच्या माहितीनुसार, ३ जानेवारीला सर्वप्रथम व्हाईस अॅडमिरल ए.के. चावला यांनी त्यांच्या घराबाहेरील पितळी पाटी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. या पाटीवर त्यांचा हुद्दा आणि ४२ लोधी इस्टेट असे लिहले होते. मात्र, तक्रारीनंतर काही दिवसांतच नामफलकावरची चांदीचा मुलामा चढवलेली अक्षरे ही नजीकच्या झुडपांमध्ये सापडली. या घटनेच्या दोन आठवड्यांपूर्वीच या परिसरात राहणाऱ्या लेफ्टनंट कर्नल हुद्द्यावरील अधिकाऱ्याच्याबाबतीतही असाच प्रकार घडला होता. पोलिसांनी या घटनांना दुजोरा दिला असून या चोऱ्यांचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पिंकी आनंद यांच्या घरातील दरोड्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण आणखी गांभीर्याने घेतले आहे. आनंद यांच्या घरातील नोकराने दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी बंगल्याची भिंत ओलांडून आतमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी पुढच्या दरवाजाचे लॉक तोडले. त्यानंतर त्यांनी तीन खोल्यांच्या काचा फोडल्या व त्यांनी घरातील एलईडी टीव्ही सेट, नळ, शॉवर आणि उंची सूट घेऊन पोबारा केला. या घटनेनंतर पिंकी आनंद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या भागात अनेक वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी राहत असल्याने दिल्ली पोलिसांनी त्वरीत पावले उचलावीत, असे त्यांनी म्हटले. पोलिसांनी या घटनेची दखल घेत आता चोरट्यांना शोधण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.

चोरट्यांनी ल्यूटन्स झोन्ससारख्या अतिमहत्त्वाच्या परिसरात चोऱ्या करण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. यापूर्वी ल्यूटन्स झोन्समधून फणस, टायर्स आणि लाईटचे बल्ब चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. जून २०१४ मध्ये राज्यसभेतील खासदार महेंद्र प्रसाद यांच्या तुघलक रोड येथील निवासस्थाहून दोन फणस चोरीला गेल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. तर ऑगस्ट २०१४ मध्ये फिरोजशहा रोड येथे राहणाऱ्या लोकसभा खासदाराच्या घरातील लाईटचे बल्ब चोरीला गेले होते. याशिवाय, गेल्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या लोधी इस्टेट येथील घरातून महात्मा गांधींजींचा चष्मा मौल्यवान चष्मा आणि इतर वस्तू चोरीला गेल्या होत्या.