संपूर्ण दिशादर्शक यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल
भारतातील विविध ठिकाणांची माहिती पुरविण्याच्या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी पीएसएलव्ही-सी३३ या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या साहाय्याने आयएनआरएसएस-१जी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. संपूर्ण दिशादर्शक यंत्रणा उभारण्याच्या दृष्टिकोनातून भारताने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांची पाठ थोपटली असून देशातील जनतेचे अभिनंदन केले आहे.
भारताच्या दिशादर्शक उपग्रहांच्या मालिकेतील हा सातवा आणि अखेरचा उपग्रह असून त्यामुळे भारताने आता दळणवळणासाठी स्वतंत्र उपग्रह व्यवस्था असलेल्या देशांच्या विशेष गटात स्थान मिळविले आहे. अमेरिकास्थित जीपीएसच्या धर्तीवरील ही यंत्रणा आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्हीच्या साहाय्याने दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. मंगळवारी सकाळी या मोहिमेची उलट गणती सुरू झाली होती. या उपग्रहावर दोन नौकानयन आणि रेजिंग यंत्रणा आहे.
सदर उपग्रह जवळपास ४४.४ मीटर लांब आणि ३२० टन वजनाचा आहे. ध्रुवीय प्रक्षेपण यानाने आयआरएनएसएस-१जीसोबत अंतराळात प्रस्थान केले. इस्रोच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांची पाठ थोपटली असून जनतेचे अभिनंदन केले आहे. आपला मार्ग आपण ठरविणार, कोठे आणि कसे जावयाचे ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण निश्चित करणार असल्याचे मोदी म्हणाले. नव्या तंत्रज्ञानाचा देशातील जनतेला, मच्छीमारांना लाभ होईल. शास्त्रज्ञांनी देशाला दिलेली ही मोठी भेट आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. आयआरएनएसएस चार उपग्रहांसह यापूर्वीच कार्यान्वित झाले आहे. उर्वरित तीन उपग्रह हे अधिक सक्षम आणि परिणामकारक यंत्रणा उभारण्यासाठी गरजेचे होते, असे इस्रोने म्हटले आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शास्त्रज्ञांचे अभिनंदन
नवी दिल्ली- भारतीय दिशादर्शक उपग्रह आयआरएनएसएस-१जीचे गुरूवारी यशस्वी प्रक्षेपण केल्याबद्दल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या या कामगिरीमुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील क्षमता सिद्ध झाली असल्याचे या नेत्यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांवर स्तुतिसुमनांचा वर्षांव केला आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी देशाची मान उंचावली आहे, असे या नेत्यांनी संदेशात म्हटले आहे.