जागतिक तापमानवाढ आणि हवामानात होणाऱ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर भारताकडून महत्वपूर्ण पाऊले उचलली जातील, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच जागतिक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी विशेष योजना आखणार असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले. जागतिक हवामानातील बदल आणि परिणाम याविषयी प्रकाश जावडेकर आणि फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्ट फॅबिअस यांच्यात चर्चा झाली.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी भारताकडून राबविण्यात येणाऱ्या प्रयत्नांसाठी पुढील तीन वर्षात फ्रान्सकडून भारताला १० लाख युरोचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पुढील वर्षी फ्रान्समध्ये जागतिक हवामान परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी फ्रान्सच्या या मदतीचे स्वागत केले. तसेच येणाऱ्या काळात भारताकडून हवामानाची स्थिती योग्य राखण्यासाठी योग्य ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली. मात्र, जागतिक हवामानाची स्थिती योग्य राखण्यासाठी प्रगत राष्ट्रांकडून योजण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी योग्यप्रकारे झाली पाहिजे याकडेसुद्धा जावडेकर यांनी लक्ष वेधले.