मार्स ऑर्बिटर यानाने (मंगळयान) बुधवारी सकाळी यशस्वीपणे मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केल्याने भारताच्या ऐतिहासिक अशा मंगळ मोहिमेच्या यशावर शिक्कामोर्तब झाले. मागील ३०० दिवसांपासून निद्रितावस्थेत असलेल्या लिक्विड अ‍ॅपॉजी मोटर या इंजिनाला प्रज्वलित करण्याचा प्रयोग सोमवारी यशस्वी ठरल्यानंतर या मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली होती. त्याप्रमाणे बुधवारी सकाळी चार वाजून १७ मिनिटांनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सर्व प्रक्रियेला सुरूवात केली. त्यानंतर या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा टप्पा समजला जाणाऱ्या आठ छोटय़ा लिक्विड इंजिनांना सकाळी साधारण सात वाजून ३० मिनिटांनी प्रज्वलित करण्यात आले. त्यामुळे यानाला ४४० न्यूटन इतका जोर मिळाला. मंगळाच्या कक्षेत यानाला स्थिर करताना यानाचा वेग कमी करणे गरजेचे होते. मंगळमोहिमेच्या या परमोच्च क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (इस्ट्रॅक) येथे उपस्थित होते. मंगळाच्या कक्षेत दाखल झालेले हे मंगळयान १ डिसेंबरला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर पडले होते.  जगातील विविध देशांनी आजपर्यंत मंगळावर ५१ मोहिमा आखल्या असून, त्यातील केवळ २१ यशस्वी झाल्या आहेत. मात्र, भारत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरल्यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आहे.

कशाप्रकारे ‘मंगळयान’ मंगळ ग्रहाच्या कक्षेत झाले दाखल…

सकाळी ७.३०- लिक्विड अ‍ॅपॉजी मोटार आठ इंजिनांनी प्रज्वलित
सकाळी ७.४५- यानाकडून पृथ्वीवर सिग्नल येण्यास सुरूवात
सकाळी ८.००- यानाचा मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश
इस्रोने अपलोड केलेल्या आज्ञावलीप्रमाणे यान कार्यरत