भारताची सर्वात मोठी युद्धनौका आणि नौदलाचे सामर्थ्य वाढवणा-या आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशिन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मशिन सॅटेलाईटवर चालणार असून एटीएमची सुविधा असलेली विक्रमादित्य ही पहिलीच युद्धनौका ठरणार आहे.

भारतीय नौदलात दाखल झालेली आयएनएस विक्रमादित्य ही तिसरी विमानवाहू युद्धनौका आहे. आयएनएस विक्रमादित्य या बलशाली विमानवाहू युद्धनौकेवर अतिअद्ययावत संवाद आणि युद्धयंत्रणा बसविण्यात आली आहे. आयएनएस विक्रमादित्य या तरंगत्या युद्धभूमीची उंची ६० मीटर्स उंच असून ही उंची २० मजली इमारतीएवढी आहे. तिच्या २० मजल्यांमध्ये २४ डेक्स आहेत. युद्धनौकेची लांबी २८४ मीटर्स म्हणजेच फुटबॉलची तीन मैदाने एका ओळीत ठेवली तर त्यांच्या लांबीइतकी आहे. तिच्यावर असलेल्या १६०० ते १८०० नौसनिकांना महिन्याभरासाठी दर महिन्याला एक लाख अंडी, २० हजार लीटर्स दूध आणि १६ टन तांदूळ लागतो. ही रसद पूर्ण भरलेल्या अवस्थेत ही विमानवाहू युद्धनौका सलग ४५ दिवस प्रवास करू शकते. दर दिवशी ४०० टन खारे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी यावर एक जलशुद्धीकरण प्रकल्पच वसविण्यात आला आहे. या युद्धनौकेची २४ विमान आणि १० हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता आहे.२०१३ मध्ये यूपीए सरकारच्या काळात ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झाली होती.

देशाच्या रक्षणासाठी दिवसरात्र झटणा-या जवानांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विक्रमादित्य युद्धनौकेवरील नौसैनिकांच्या मदतीसाठी युद्धनौकेवर एटीएम मशिन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मदतीने ही मशिन बसवली जाणार असून सॅटेलाईटच्या मदतीने ही मशिन चालणार आहे.