सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक  खटल्यातील आरोपी पोलीस अधिकाऱ्याची गुजरात सरकारने पुन्हा नियुक्ती केली. या अधिकाऱ्याला पोलीस महासंचालकांच्या सतर्कता पथकात अधीक्षकपदाचा भार दिल्याचे गुरुवारी मध्यरात्री गुजरातच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.
चार वर्षे तुरुंगात काढाव्या  लागलेले अभय चुडासामा हे सोहराबुद्दीन शेख खटल्यातील आरोपी म्हणून पहिले आयपीएस अधिकारी होते. त्यांची गुजरात राज्य सरकारने पोलीस दलात नव्याने नियुक्ती केली. इशरत जहां खटल्यातील आरोपी असलेले पोलीस अधिकारी जी. एल. सिंघल यांची याआधी पोलिसांत पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. अधिसूचनेत स्पष्ट केल्याप्रमाणे चुडासामा यांना २८ एप्रिल २०१४ रोजी जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यांना गांधीनगर पोलीस महासंचालकांच्या सतर्कता पथकात पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या पथकालाच सध्या ‘राज्य निरीक्षण कक्ष’ असे नाव देण्यात आले आहे. हा कक्ष गुजरात राज्य पोलीस महासंचालकांच्या अंतर्गत काम करतो; तथापि या कक्षाचे लोकप्रिय नाव महासंचालक सतर्कता पथक असे आहे. या पथकाच्या प्रमुखाला ज्यादा अधिकार देण्यात आले आहेत. गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी राज्यातील कोणत्याही भागात छापा टाकण्याचे अधिकार अधीक्षकाला आहेत. चुडासामा हे १९९९ च्या बॅचचे अधिकारी आहेत. २०१० साली त्यांना सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी सीबीआयने अटक केली होती.