इराकमधील मोसूल येथे आयसिस या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या ३९ भारतीयांच्या कुटुंबियांच्या डीएनएचे नमुने घेण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे. डीएनएचे नमुने इराक आणि सीरियात पाठवणार असल्याची  माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी दिली.

मोसुलमध्ये २०१४ मध्ये आयसिसने ४० भारतीयांचे अपहरण केले होते. यातील हरजित मसिह हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. बादुश येथील वाळवंटात उर्वरित ३९ भारतीयांची हत्या करण्यात आली होती, असा दावा त्याने केला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील लोकसभेत यावर निवेदन दिले होते. अपहरण करण्यात आलेल्या भारतीयांना ठार मारण्यात आल्याचे कुठलेही पुरावे नाही. पुराव्याशिवाय ते मारले गेल्याचे जाहीर करण्याचे पाप मी करणार नाही, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले होते.

आयसिसला सीरिया आणि इराकमधून हद्दपार केल्यानंतर आता परराष्ट्र मंत्रालयाने पुन्हा एकदा ३९ भारतीयांचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने अपह्रत भारतीयांच्या कुटुंबियांच्या डीएनएचे नमुने गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. सीरिया आणि इराकमधील युद्धाची झळ निवासी भागालाही बसली आहे. इराक आणि सीरियात कार्यरत असलेल्या समाजसेवी संघटनाची मदतकार्य सुरु केले असून मदतकार्यादरम्यान ढिगाऱ्या खालून अनेक मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत.  आयसिसच्या तुरुंगात असलेल्या किंवा शवागारातील मृतदेहांमध्ये भारतीयांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. यात डीएनए चाचणी महत्त्वाचा पुरावा ठरु शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय बगदाद, दमस्कस या शहरांमधील स्थानिक सरकारी यंत्रणांशी परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी संपर्कात आहे, असे सूत्रांनी सांगितले.