ललित मोदी प्रकरणावरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा राजीनामा न घेतल्यास संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, हा कॉंग्रेसने दिलेला इशारा फेटाळून लावत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काही नेते केवळ वृत्तवाहिन्यांसाठी महत्त्वाचे असतात, सरकारच्या दृष्टीने त्यांना काहीही महत्त्व नसल्याचे सांगत पलटवार केला.
ते म्हणाले, देशाच्या विकासाच्या दृष्टीने वस्तू आणि सेवा कर विधेयक त्याचबरोबर भू संपादन विधेयकातील सुधारणा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणताही राजकीय पक्ष देशाच्या विकासाच्या विरोधात भूमिका घेऊ शकत नाही, असे मला वाटते. काही लोकांना वृत्तवाहिन्यांच्या दृष्टीने महत्त्व असते. मात्र, सरकारच्या दृष्टीने त्यांना अजिबात महत्त्व नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. देशाच्या विकासाच्या दृष्टीने वस्तू आणि सेवा कर विधेयक त्याचबरोबर भूसंपादन सुधारणा विधेयकाला अत्यंत महत्त्व असल्याचेही त्यांनी सांगितले.