सर्वोच्च न्यायालयाने जलिकट्टूवर टाकलेल्या बंदीविरोधात तामिळनाडूत सध्या जोरदार विरोध करण्यात येत आहे. राज्यभरातून सर्वच स्तरातील लोकांपासून नेते, अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. आता या वादात एमआयएमआयएमचे प्रमूख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही उडी घेतली असून हिंदुत्ववाद्यांसाठी हा एक धडा असल्याचे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी समान नागरी कायद्याचा मुद्दा पुढे केला आहे. ‘जलिकट्टूबाबत होत असलेले निदर्शने ही हिंदुत्ववाद्यांसाठी एक धडा आहे. समान नागरी कायदा या देशावर थोपवला जाऊ शकत नाही. कारण येथे एकच संस्कृती नाही. आम्ही सर्व समाजाचे सण साजरा करतो,’ असे ट्विट त्यांनी केले आहे.

ओवेसी यांच्या या वक्तव्याचा संयुक्त जनता दलाचे खासदार आणि प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी समाचार घेतला आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यागी यांनी ओवेसी हे जलिकट्टू प्रकरणाला धार्मिक रंग देत असल्याच आरोप केला आहे. ते म्हणाले, आम्ही त्यांचे वक्तव्य व राजकारणाशी सहमत नाही. एकीकडे ते अल्पसंख्यांकांचे प्रकरण समोर आणत आहेत. तर दुसरीकडे जलिकट्टू प्रकरणाला धार्मिक रंग देत आहेत. भाजपला फायदा पोहोचवण्यासाठीच ओवेसी राजकारण करत आहेत. त्यासाठीच ते बिहारला आले होते, असे म्हणत ओवेसी यांच्या या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.
जलिकट्टूवरून तामिळनाडू राज्यात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्य सरकार याप्रकरणी अध्यादेश आणत आहे. मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मादी यांची भेट घेऊन त्यांना अध्यादेशासंबंधी विनंतीही केली आहे. पंतप्रधानांनीही राज्य सरकारला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगितले. परंतु अध्यादेश आणण्यासाठी नकार दिला आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे त्यावर अध्यादेश आणता येत नसल्याचे त्यांनी पनीरसेल्वम यांना सांगितले आहे. दरम्यान संगीतकार ए.आर. रेहमान हे जलिकट्टूच्या समर्थनात आज एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे सांगण्यात येते.