पीडीपीने जम्मू व काश्मीरमध्ये सरकार स्थानपनेसाठी भाजपबरोबर जाण्याचे संकेत दिले असतानाच पक्षाने गुरुवारी राज्यपालांची भेट घेतली. किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सरकार चालवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे भाजपने मान्य केले. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी अवधी द्यावा, अशी विनंती भाजपने राज्यपालांकडे केली. तसेच जम्मूचाच मुख्यमंत्री हवा या आपल्या भूमिकेबाबत लवचीकता दाखवली आहे.
राज्यपालांनी सरकार स्थापनेसंदर्भात १९ जानेवारीपर्यंत मुदत दिली आहे. लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळेल असे भाजप प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर शर्मा यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर स्पष्ट केले. जम्मूचा मुख्यमंत्री हवा अशी भूमिका भाजपची आहे. त्याबाबत प्रदेश प्रभारी अविनाश राय खन्ना यांना विचारले असता, त्यांनी थेट उत्तर दिले नाही. मात्र आघाडी सरकार कसे चालवायचे हे आम्हाला माहीत आहे असे उत्तर दिले. आम्ही जेव्हा चर्चेला एकत्र बसू, तेव्हा किमान समान कार्यक्रमाच्या आधारे कार्यक्रम ठरवू असे सांगत, संभाव्य आघाडीचे संकेत दिले.
जनतेने भाजपला कौल दिला आहे. स्थिर सरकार स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे. मात्र आम्हाला कोणतीही घाई नाही. सरकार पूर्ण सहा वर्षे टिकावे अशी भाजपची इच्छा असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. पीपल्स डेमॉक्रेटिक पक्ष व नॅशनल कॉन्फरन्सच्या नेतृत्वाशी चर्चा सुरू आहे काय असे विचारता, चर्चेची प्रक्रिया सुरू आहे एवढेच उत्तर त्यांनी दिले. बुधवारी पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.