रिलायन्स जिओने ग्राहकांसाठी जाहीर केलेल्या मोफत डेटा व अमर्यादित व्हॉइस कॉल्स सेवेच्या पार्श्वभूमीवर आता बीएसएनलकडूनही लवकरच नवी योजना आणण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना केवळ १४९ रूपयांत अमर्यादित डेटा  आणि एसटीडी कॉल्सची सेवा उपलब्ध होणार आहे. येत्या १ जानेवारीपासून बीएसएनएल या नव्या प्लॅनची घोषणा करण्याची शक्यता आहे.

रिलायन्स जिओने तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या ४ जी सेवेतील सर्व विद्यमान व नव्या ग्राहकांना ३१ मार्च २०१७ पर्यंत मोफत डेटा व अमर्यादित व्हॉइस कॉल्स सेवा देणारी योजना जाहीर केली होती. यामध्ये २८ दिवसांसाठी १४९ रूपयांमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल्स, ३०० एमबी डेटा आणि १०० लोकल व नॅशनल एसएमएसची सुविधा मिळत आहे. बीएसएनलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार, मासिक १४९ रूपयांच्या शुल्कामध्ये ग्राहकांना देशांतर्गत कोणत्याही नेटवर्कशी अमर्याद व्हॉईस कॉल्स देण्याच्या योजनेवर आम्ही विचार करत आहोत. या योजनेत ३०० एमबीचा डेटाही मिळेल. बीएसएनएलची ही योजना रिलायन्सच्या जिओला टक्कर देणारी असल्याचे म्हटले जात आहे. जिओच्या बाजारपेठेतील प्रवेशामुळे देशातील टेलिकॉम कंपन्यांसमोरील आव्हान वाढले आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी विस्तार योजनेची घोषणा गुरुवारी केली होती.  ‘जिओ न्यू इयर ऑफर’अंतर्गत ग्राहकांना मोफत डेटा, व्हॉइस तसेच व्हिडीओ व अ‍ॅप्लिकेशन सुविधा मिळणार आहे. नव्या योजनेद्वारे ग्राहकांना घरपोच सिम कार्ड पुरविण्याचेही आश्वासन देण्यात आले होते. अन्य टेलिकॉम कंपन्यांनीही जिओच्या घोषणेनंतर अमर्याद कॉल्सचे प्लान आणले आहेत. पण जिओच्या तुलनेत त्यांचे दर जास्त आहेत. मात्र, बीएसएनएलचा नवा प्लॅन जिओच्या तोडीस तोड ठरण्याची शक्यता आहे. जिओनंतर स्वस्त दरात अमर्याद व्हॉइस कॉल्सचा आकर्षक प्लान देणारी बीएसएनएल ही दुसरी कंपनी असेल.