एस्सार कंपनीच्या एका अधिकाऱ्याने जून २००९मध्ये बडे राजकीय नेते आणि नोकरशहांकडून आलेल्या नोकरीविषयक शिफारसी कशा हाताळाव्यात याबाबत एका कार्यालयीन पत्रामध्ये मार्गदर्शन केले आहे.
राजकारणी, नोकरशहा, पत्रकारांवर ‘एस्सार’मेहेरबान!
‘दिल्लीमध्ये आमचा उच्चपदस्थ राजकीय नेत्यांसह पोलाद, पेट्रोलियम, ऊर्जा, जहाजबांधणी, दूरसंचार मंत्रालये आणि इतर काही जणांशी या-ना त्या प्रकरणाबाबत संवाद होत असतो. इतकेच नव्हे, तर बहुतांश वेळी त्यांनी ज्या तरुणांची नोकरीसाठी शिफारस केलेली असते, तेदेखील उच्चशिक्षित, हुशार आणि सक्षम असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या विनंत्यांसाठी किमान २०० नोकऱ्या राखून ठेवल्या जाव्यात आणि या श्रेणीत मोडणाऱ्या पात्र अर्जदारांसाठी औद्योगिक विभागांनी धोरण निश्चित करावे. आम्ही पुरवलेली नावे त्या-त्या विभागाच्या मनुष्यबळ विभागाच्या वेगळ्या ‘डाटा बँक’मध्ये ठेवली जाऊ शकतात आणि कर्मचारी भरती करताना त्यांचा विचार केला जाऊ शकतो.’’
याबरोबरच व्हीआयपींनी शिफारस केलेल्या व्यक्तींबाबत अनेक ई-मेल्सची देवाणघेवाण करण्यात आली. २३ जुलै २०१३ रोजीच्या एका ई-मेलमध्ये साठ जणांच्या एका यादीतील अतिशय महत्त्वाच्या नावांचा उल्लेख करण्यात आला होता. यात श्रीप्रकाश जयस्वाल (तत्कालीन कोळसामंत्री), दिग्विजय सिंग (काँग्रेस सरचिटणीस) आणि यशवंत नारायणसिंग लागौरी (ज्या ठिकाणी एस्सारचे संयंत्र आहे त्या ओरिसातील केऊंझरचे खासदार) यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांचा समावेश होता.
‘त्यांच्याकडून वारंवार स्मरणपत्रे येत आहेत आणि आपण या प्रकरणांचा तत्काळ विचार करणे योग्य ठरेल,’ असे एस्सारच्या कर्मचाऱ्याने या ई-मेलमध्ये नमूद केले आहे. दुसऱ्या एका ई-मेलमध्ये, ‘या खासदाराची आपल्याला चांगली मदत होऊ शकेल.. लागौरी हे या उमेदवाराच्या शिफारशीसाठी स्वत: कार्यालयात आले होते..,’ असे लिहिले आहे.
त्यापूर्वीच्या, म्हणजे ८ जुलैच्या ई-मेलमध्ये असा उल्लेख आहे की, ‘श्रीप्रकाश जयस्वाल यांनी एक साधे काम होत नसल्याबद्दल चीड व्यक्त केली आहे. मंत्र्यांनी मला पाच उमेदवारांचा बायोडाटा दिला आहे आणि त्यापैकी खालील तिघांना नेमण्यासाठी वारंवार सुचवले आहे.’ याच दिवशीच्या आणखी एका ई-मेलमध्ये नमूद केले आहे की, ‘या तीन उमेदवारांच्या नावाचे ऑफर लेटर्स रुईया कुटुंबाच्या सदस्याने मंत्र्यांना भेटताना जवळ बाळगावेत.’
एस्सारच्या या पत्रव्यवहारात काँग्रेसचे कोषाध्यक्ष मोतीलाल व्होरा यांचाही नामोल्लेख आहे. १ एप्रिल २०१३ रोजी कंपनीच्या एका मेलमध्ये म्हटले आहे, ‘व्होराजींनी वैयक्तिकरीत्या मला विनंती केल्यामुळे आणि या उमेदवाराचे त्यांच्याशी अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे तुम्ही यात लक्ष घालावे, अशी मी तुम्हाला विनंती करतो. व्होराजी हे काँग्रेसचे अतिशय ज्येष्ठ सदस्य असले आणि सध्या त्या पक्षाचे कोषाध्यक्षपद सांभाळत असले, तरी ते सहसा कुठलेही काम सांगत नाहीत.’ मोतीलाल व्होरा यांनी दूरध्वनी करून त्यांच्या विनंतीचा पाठपुरावा केला आणि त्यांनी शिफारस केलेल्या उमेदवाराची उपमहाव्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात आली, असे यानंतरच्या ई-मेल्सवरून दिसून येते.