केरळ उच्च न्यायालयाने श्री पद्मनाभस्वामी मंदिरात सलवार आणि चुडीदार परिधान करून आलेल्या महिलांच्या प्रवेशाला बंदीला जारी ठेवण्याचा आदेश दिला आहे. देशातील श्रीमंत मंदिरात गणना होणाऱ्या पद्मनाभ मंदिरात आता सलवार कमीज आणि चुडीदार, पायजमा परिधान करून प्रवेश करता येणार नाही. न्यायालयाने निकाल देताना स्पष्ट केले आहे की, मंदिराच्या रितीरिवाजानुसार मंदिराच्या पुजारींनी घेतलेला हा निर्णय मानावा लागेल असे म्हटले आहे. मंदिराचे कार्यकारी अधिकारी के. एन. सतीश यांना मंदिराशी निगडीत परंपरा बदलण्याचा कोणताच अधिकार नसल्याचेही न्यायालयाने सांगितले.

काही दिवसांपूर्वी के. एन. सतीश यांनी परंपरांकडे दुर्लक्ष करत महिला भाविकांना ड्रेस कोडमध्ये सूट देण्याची घोषणा केली होती. त्यांनी महिलांना सलवार कमीज आणि चुडीदार पायजमा घालून मंदिरात पुजा करण्यास परवानगी दिली होती. मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांनी याला विरोध केला होता.
आतापर्यंत महिला भाविकांनी जर सलवार किंवा चुडीदार परिधान केला असेल तर त्यांना मंदिरात जाताना सर्वप्रथम कंबरेच्यावर मुंडू (धेाती) परिधान करावी लागत. केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक याचिका फेटाळताना मंदिराचे मुख्य कार्यकारी के. एन. सतीश यांना महिलांच्या ड्रेसकोडचा प्रश्न ३० दिवसांत मिटवण्यास सांगितले होते. त्या याचिकेत महिलांना सलवार कमीज आणि चुडीदार परिधान केलेल्या महिलांनाही मंदिरात जाण्याची परवानगी देण्याची मागणी करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली.
केरळ उच्च न्यायालयाच्या विभागीय बेंचने गुरूवारी पद्मनाभस्वामी मंदिरात नव्या ड्रेस कोडला परवानगी नाकारली. अनेक समूह ड्रेसकोडच्या नव्या परंपरेच्या विरोधात होते. मंदिराच्या तळघरात एक लाख कोटींचा खजिना असल्यावरून २०११ मध्ये केरळचे पद्मनाभवामी मंदिर चर्चेत आले होते.