आंतरराष्ट्रीय न्यायालयास पाकिस्तानची विनंती

भारतीय नौदलातील माजी कर्मचारी कुलभूषण जाधव प्रकरणाची सुनावणी लवकर घ्यावी, अशी विनंती पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे केली असल्याचे माध्यमांतील काही वृत्तांमध्ये म्हटले आहे.

कुलभूषण जाधव हा हेरगिरी करीत असल्याचा कांगावा करून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाने त्या शिक्षेला स्थगिती दिल्याने पाकिस्तान तोंडघशी पडले आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हेगस्थित आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या रजिस्ट्रारना पत्र पाठविले असून जाधव प्रकरणाची सुनावणी लवकर घेण्याची, किंबहुना पुढील काही आठवडय़ांतच इच्छा व्यक्त केली आहे, असे वृत्त ‘दी एक्स्प्रेस ट्रिब्यून’ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशांची नोव्हेंबर महिन्यात निवड होणार असल्याने पाकिस्तानने वरील विनंतीवजा इच्छा व्यक्त  केली असल्याचे ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. तथापि, आंतरराष्ट्रीय न्यायालय या प्रकरणाची सुनावणी ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्याची शक्यता आहे, असे एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. सरकारला पुढील सहा आठवडय़ांत या प्रकरणाची सुनावणी हवी आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.

पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी जनरल अश्तार औसफ अली हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात हजर राहण्याची शक्यता आहे. मात्र पाकिस्तानचे अ‍ॅटर्नी खवार कुरेशी यांना बदलण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.