‘भाजप हटाव, देश बचाव’चा नारा देत रस्त्यावर उतरून बिहार बंदची हाक देणाऱया राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना सोमवारी बिहार पोलिसांनी अटक केली. कोतवाली पोलीस ठाण्यात लालूप्रसाद यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. लालूप्रसाद यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. लालूप्रसाद यांच्यावर कलम १४७, १४९, ३४१, ३५३, ३२३ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, असे पाटणाच्या वरिष्ठ पोलीस अधिकारी विकास वैभव यांनी सांगितले.
लालूप्रसाद यांनी पुकारलेल्या बिहार बंद आंदोलनात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्या घेऊन रेल्वेगाड्या रोखून धरल्याने राज्यातील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. तसेच ‘रादज’च्या कार्यकर्त्यांनी राज्यातील दुकाने आणि शिक्षणसंस्था जबरदस्तीने बंद पाडल्या. बिहार बंदचा फटका पटणा न्यायालयाच्या कामकाजाला देखील बसला.