बेळगाव आणि आजूबाजूची गावे तातडीने केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी बुधवारी पुन्हा एकदा शिवसेनेकडून लोकसभेत करण्यात आली. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शून्यकाळात हा मुद्दा उपस्थित करीत येळ्ळूरमध्ये कर्नाटक पोलीसांनी मराठी बांधवांवर केलेल्या दडपशाहीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. तत्पूर्वी, शिवसेनेच्या खासदारांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे बुधवारी सकाळी सभागृहाचे कामकाज एक तासासाठी तहकूब करण्यात आले होते.
शिवसेनेच्या खासदारांनी सभागृहाचे कामकाज सुरू होताच, कर्नाटक पोलीसांच्या दडपशाहीविरोधात घोषणाबाजी सुरू केली. बेळगाव, कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यास शिवसेनेच्या खासदारांनी सुरुवात केली. सुमित्रा महाजन यांनी शून्य काळात हा मुद्दा उपस्थित करण्याची सूचना केली. मात्र, शिवसेनेचे खासदार ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी प्रश्नोत्तराचा तास रद्द करून येळ्ळूरमधील घटनेवर चर्चा करण्याची मागणी केली आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली. खासदारांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमून घोषणा देण्यास सुरुवात केल्यामुळे महाजन यांनी कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब केले. कर्नाटक पोलीस हाय हाय, अशाही घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.