श्रीमंत गटातील व्यक्तींसाठी स्वयंपाकाच्या गॅसचे अनुदान बंद करण्याचा सरकारचा विचार आहे, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.
एचटी लीडरशिप समीटमध्ये त्यांनी सांगितले, की श्रीमंत लोकांना स्वयंपाकाच्या गॅसवर अनुदान देणे बंद करणे हा यापुढील महत्त्वाचा निर्णय असेल. लवकरच हा निर्णय घेतला जाईल.
अनुदानास कोण पात्र आहे, कोण नाही हे बघितले पाहिजे. सध्या ग्राहकांना १२ सिलिंडर अनुदानितम म्हणजे ४१४ रु. (दिल्लीत) मिळतात. त्यानंतरचे सिलिंडर ८८० रुपये दराने खरेदी करावे लागतात. काही निर्णय गुंतागुंतीचे होते, पण ते नवीन सरकारने वेळ वाया न घालवता घेतले असे ते म्हणाले. डिझेलच्या दरावरील नियंत्रण उठवणे व ते बाजारदराशी जोडणे हा निर्णय मोदी सरकारने घेतला.
गुड्स अँड सव्‍‌र्हिस टॅक्सचा प्रस्ताव तयार आहे व त्याबाबतचे विधेयक सोमवारी मांडले जाईल. विमा क्षेत्र आणखी खुले करून २६ टक्क्यांवरून ४९ टक्के थेट परकीय गुंतवणूक आणणार आहोत व त्याचे विधेयकही तयार आहे असे त्यांनी सांगितले.