सुप्रसिद्ध मेंडोलिन वादक श्रीनिवास यांचे शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास चेन्नईतील खासगी रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. ते केवळ ४५ वर्षांचे होते.
यकृताशी संबंधित दिर्घ आजाराने शुक्रवारी चेन्नईतील अपोलो रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मेंडोलिन वादनाच्या आपल्या विलक्षण कौशल्याच्या जोरावर कर्नाटकी संगिताला श्रीनिवास यांनी एक वेगळी उंची गाठून दिली होती.
श्रीनिवास यांच्या या अशा अचनाक जाण्याने संगितप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. संगीत दिग्दर्शक ए.आर.रेहमान यांनीही श्रीनिवास यांच्या जाण्याच्या वृत्ताने धक्का बसल्याचे म्हणत संगीत क्षेत्राला मोठा फटका बसल्याची प्रतिक्रीया दिली.    
इलेक्ट्रिक मेंडोलिन वाजविण्यात श्रीनिवास यांचा हातखंडा होता. जॉन मिकवॉक्ले आणि मिचेल न्येमन यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय मेंडोलिन दिग्गजांमध्ये श्रीनिवास यांचे नाव घेतले जाते. १९९८ साली श्रीनिवास यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित करण्यात आले होते. तर, २०१० साली संगीत नाटक अकादमीच्याही पुरस्काराचे ते मानकरी ठरले होते. आपल्या धार्मिक जीवनात श्रीनिवास हे ‘सत्य साईबाबा’ यांचे भक्त राहिले होते. अनेकवेळा सत्य साईबाबांसाठी त्यांनी आपल्या मेंडोलिन वादनाचे कार्यक्रमही आयोजित केले होते.