खासदार अमर साबळे यांचा आरोप

सत्ताहीन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस वैफल्यग्रस्त झाली आहे. म्हणून तर शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता कोपर्डी बलात्कार प्रकरणानंतर जातीय पातळीवर उतरला आहे. त्यातूनच मराठवाडय़ामध्ये लाखोंचे मोर्चे काढण्यासाठी पवार मराठा समाजाला भडकावीत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे राज्यसभेतील खासदार अमर साबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मराठा समाजाच्या शक्तिप्रदर्शनाने दलित भयभीत झाल्याचाही दावा त्यांनी केला.

कोपर्डी बलात्कार प्रकरणाचा आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसिटीज) रद्द करण्याचा संबंध काय, असा सवाल करून साबळे म्हणाले, ‘भारत सरकारच्या ताज्या अहवालाने अ‍ॅट्रॉसिटीज कायद्याचा गैरवापर होत असल्याचा भ्रम दूर झाला आहे. राज्यात मागील वर्षांत फक्त १७९५ घटनांमध्ये हा कायदा वापरला आहे. १ कोटी ३२ लाख दलित राज्यात असताना १७९५ गुन्हे हे अगदीच किरकोळ प्रमाण आहे. देशभराच्या तुलनेतही हे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे दुरुपयोग तर सोडाच, याउलट अनेक सत्य घटनांमध्ये अ‍ॅट्रॉसिटीज् कायदा पोलीस लावत नसल्याच्या तक्रारी आहेत.’

कोपर्डी प्रकरणाच्या पाश्र्वभूमीवर मराठवाडय़ातील जिल्ह्य़ांमध्ये मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघाले आहेत. त्याने राजकीय- सामाजिक वर्तुळातील वातावरण गरम झाले आहे. पवारांवर पहिल्यांदा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आणि आता त्यापाठोपाठ भाजपचा दलित चेहरा म्हणून पुढे येत असलेले साबळे सरसावले आहेत.

मराठय़ांच्या शक्तिप्रदर्शनामागे राज्य सरकार पाडण्याचे कटकारस्थान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीने पवारांना पोटशूळ उठला आहे. ऐंशी ते नव्वद टक्के मराठा समाज दारिद्रय़ात पिचत असताना त्यांच्यासाठी आतापर्यंत काही भरीव न करणाऱ्या आणि उठता बसता फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाने राजकारण करणारे शरद पवार मराठा समाजाला भडकावीत आहेत. त्यांच्या छुप्या पाठिंब्याने राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस आदी मंडळी हे सारे घडवून आणीत आहेत. एवढय़ा जातीय थराला राजकारण नेणे धोकादायक आहे. फक्त मराठा समाजालाच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याची भीती का वाटते आहे? हे जर वेळीच थांबले नाही तर त्याचे सामाजिक पडसाद उमटण्याचा इशारा त्यांनी दिला.

कोपर्डीतील एका बलात्काराच्या घटनेने मराठा समाजाचे एवढे पित्त खवळते.. तर फक्त एका वर्षांत २३८ दलित माताभगिनींवर बलात्कार झाले असताना दलितांनी किती आक्रोश, संताप व्यक्त करायला हवा.. पण मूठभर आरोपींवरून संपूर्ण समाजाला लक्ष्य करणे योग्य नसते. 

अमर साबळे, भाजप राज्यसभा सदस्य