समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांचा ७५ वा वाढदिवस धुमधडाक्यात समाजवादी पक्षाच्या वतीने साजरा केला जात आहे. वाढदिवसाचे कार्यक्रम उत्तर प्रदेश सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आझम खान यांच्या रामपूर मतदारसंघात होणार आहे. त्यासाठी एवढा निधी कोठून आला असे विचारता संतापलेल्या आझम यांनी तिरकसपणे हे पैसे तालिबान, दाऊद यांच्याकडून आला असे सांगत वाद ओढवून घेतला.
मुलायमसिंह यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवस धुमधडाक्यात कार्यक्रम होणार आहेत. ७५ फूट केक कापला जाणार आहे. खास लंडनहून आणलेल्या बग्गीतून मुलायमसिंह यांनी सहकाऱ्यांसह रपेट मारली. यावेळी मुख्यमंत्री अखिलेश यादव तसेच मंत्रिमंडळातील इतर सहकारी उपस्थित होते.  वाढदिवसचा थाटमाट आहे. आझमखान कुलपती असलेल्या जौहर विद्यापीठात वाढदिवसाचा कार्यक्रम आहे. स्वागतासाठी फुलांनी सजवलेली २०० प्रवेशद्वारे आहेत. मोठय़ा प्रमाणात फलक लावण्यात आले आहेत.  त्यामुळे समारंभावर मोठा निधी खर्च केला जात असल्याची टीका सुरू आहे. त्यावरून प्रश्न  विचारताच संतापलेल्या आझम खान यांनी नवा वाद निर्माण केला.आझम खान यांच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत असून मुलायमसिंह यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसही वादाच्या गर्तेत सापडेल, असा अंदाज निरीक्षकांनी व्यक्त केला.
‘ताजमहाल वक्फ मंडळाच्या ताब्यात द्या’
जगातील सातवे आश्चर्य मानले जाणारा ताजमहाल हा वक्फ मंडळाच्या ताब्यात देण्यात यावा,   कारण ते मुस्लीम व्यक्तीच्या समाधीचे ठिकाण आहे, अशी सूचना उत्तर प्रदेशचे मंत्री व समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी म्हटले आहे.ताजमहाल हे समाधीचे ठिकाण असून ते वक्फ आहे व त्यामुळे ते सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाच्या ताब्यात देण्यात यावे, असे नगर विकास मंत्री आझम खान यांनी सांगितले. ताजमहाल हे शहाजहान व मुमताज महल यांचे स्मारक आहे, त्यामुळे ते कोण होते हा वादाचा विषय नाही. धर्मात राजा व त्याचे शिष्य समान असतात असे सांगून ते म्हणाले की, त्या समाधीवर इमारत बांधण्यात आली तो वेगळा भाग आहे, जर कुणाला ती इमारत किरकोळ वाटत असेल तर ती वक्फ मंडळाच्या ताब्यात द्यावी. जर ती महागडी इमारत असेल, महसूल मिळवत असेल तर भारत सरकारने त्याचे पैसे घ्यावे. ताजमहाल हा सुन्नी केंद्रीय वक्फ मंडळाला  सोपवण्यात यावा त्यामुळे आम्ही आमची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून निझामाची नेमणूक करू व उत्पन्नातून मुस्लिमांच्या शिक्षणासाठी पैसे जमा करू, असे सांगून ते म्हणाले की, ताजमहालमधून दोन विद्यापीठे उभी राहतील व त्यांच्या कामकाजासाठी निधी मिळेल.