अयोध्येमध्ये राममंदिर बनावे ही मुस्लिमांचीही इच्छा आहे असे पोस्टर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे लावण्यात आले आहेत. पूर्ण शहरात राम मंदिर निर्माणाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हिंदू आणि मुस्लिमांनी समजूतदारपणे या विषयावर चर्चा करावी असे न्यायालयाने म्हटले होते. या पोस्टरनंतर भारतीय जनता पक्षाने आपले काही मत मांडले नाही. भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिराचा उल्लेख केला आहे. सत्तेमध्ये आल्यावर राम मंदिर बांधले जाईल असे त्यांनी म्हटले होते. मुस्लिमों का यही अरमान, श्रीराम मंदिर का हो वहीं निर्माण असे मुस्लिमांनी आपल्या पोस्टरवर लिहिले आहे. मुस्लिम कार सेवक मंचाचे अध्यक्ष आजम खान यांनी पूर्ण शहरात असे दहा पोस्टर्स लावले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून हिंदू आणि मुस्लिमांमध्ये समन्वय घडवून अयोध्येमध्ये राम मंदिर बनावे यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कार्याला दोन्ही धर्मियांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. परंतु काही लोक त्यांना धमक्या देखील देत आहे असे त्यांनी म्हटले. असे असले तरी आपण हे कार्य करत राहू असे त्यांनी म्हटले आहे.  श्रीराम हे केवळ हिंदुनांच पूजनीय आहेत असे नाही तर ते मुस्लिमांचेही आदर्श आहेत असे आजम खान म्हणतात. आपण हाती घेतलेल्या कार्यामुळे कधी आपले कौतुक होते तर कधी मला इमेल द्वारे धमक्याही मिळतात असे ते म्हणाले.

तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की त्या ठिकाणी तुम्ही मशीद बांधण्यासाठी का प्रयत्न करत नाही. त्यांना उत्तर देताना आपली दमछाक होत असल्याचे आजम खान यांनी म्हटले. आपण राम मंदिराच्या निर्माणासाठी आवश्यक ते वातावरण बनवू असे त्यांनी इंडिया टुडेला सांगितले. याआधी भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मुस्लिमांनी मंदिर निर्माण कार्यास सहकार्य करावे असे आवाहन केले होते. जर मुस्लिमांनी आम्हाला मदत केली तर ती आनंदाची बाब ठरेल असे ते म्हणाले होते. भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेत बहुमत आल्यानंतर आम्ही मंदिर बांधूच असे ते म्हणाले होते.