नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांचे राज्यांना आवाहन

देशाचा विकास झपाटय़ाने साधावयाचा असेल तर सर्व राज्यांनी एकत्र येऊन पायाभूत सेवासुविधांच्या विकासाचा वेग वाढवायला हवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे आयोजित नीती आयोगाच्या बैठकीत केले. देशाच्या विकासाचा पुढील १५ वर्षांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार सर्व राज्यांनी काम केल्यास देश निश्चितच प्रगती साधेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली येथे झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना मोदी पुढे म्हणाले, ‘नीती आयोगाने दीर्घ, मध्यम आणि अल्प मुदतीचे कृती आराखडे निश्चित केले असून १५ वर्षांचा विकासाचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. संपूर्ण ‘टीम इंडिया’ या बैठकीच्या निमित्ताने येथे उपस्थित असून सर्वानी एकदिलाने काम केल्यास देशाची अर्थव्यवस्था नजीकच्या भविष्यात नक्कीच देदीप्यमान कामगिरी करेल, यात शंका नाही. २०२२ मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व राज्यांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे.’ देशाचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने नीती आयोगाने आखणी केली असून सर्व सरकारे, खासगी क्षेत्र आणि समाजातील सर्व गटांनी एकत्र येऊन विकास साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.

मोदी म्हणाले..

  • मुख्यमंत्र्यांना राज्यांच्या अर्थसंकल्पाच्या वा विविध योजनांवरील खर्चाच्या मंजुरीसाठी नीती आयोगाकडे येण्याची गरज भासणार नाही
  • नीती आयोग सरकारवर कमी अवलंबून राहील अशा दृष्टीने त्याची रचना करण्यात आली असून त्यात तज्ज्ञ व तरुण उद्योजकांचा समावेश करण्यात आला आहे
  • २०१४ ते १७ या कालावधीत केंद्र व राज्य यांच्यातील निधी वाटपाचे प्रमाण २५ टक्क्य़ांवर आले आहे
  • निकृष्ट दर्जाच्या पायाभूत सोयीसुविधांमुळे विकासात अडथळे निर्माण होत आहेत. ते टाळण्यासाठी राज्यांनी पायाभूत सोयीसुविधांच्या विकासाचा वेग वाढवणे गरजेचे आहे
  • सर्व राज्यांना त्यांचा निधी वेळेत वापरता यावा तसेच निधी वापरासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख फेब्रुवारी अखेरीस आणली
  • आधी मेपर्यंत अर्थसंकल्पातील निधीला मंजुरी मिळत नव्हती