पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादनदेशवासीयांना योगसाधनेचे आवाहन

‘‘भारतीतील भाषा, परंपरा, संस्कृतीबद्दल अनभिज्ञ असलेले अनेक देश योगाद्वारे भारताशी जोडले गेले आहेत. शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र जोडणाऱ्या योगाची जगाला एकसंध ठेवण्यातही महत्त्वाची भूमिका आहे,’’  असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी योगाला आपल्या जीवनाचा भाग बनविण्याचे आवाहन देशवासीयांना केले. तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योगदिनी मोदी यांनी लखनौमधील रमाबाई आंबेडकर मैदानातील शिबिरात भाग घेतला. लखनौ, दिल्ली, लंडन, चीनसह जगभरात योग दिन उत्साह, चैतन्याने भारलेल्या वातावरणात साजरा झाला.

लखनौच्या रमाबाई आंबेडकर मैदानातील योग शिबिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी सहभागी झाले होते. या योग शिबिरावेळी पावसाने हजेरी लावली. मात्र मोदी यांच्यासह सुमारे ५१,००० नागरिकांनी भरपावसात विविध योगासने  केली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांचे मोदी यांनी आभार मानले.

योग शिबिरानंतर मोदी यांनी अनेक ट्वीट करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘‘योगाची लोकप्रियता जगभरात वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत योग प्रशिक्षण संस्थांमध्ये मोठी वाढ झाली आहे. योगाच्या प्रशिक्षकांची मागणीही वाढली, ही आनंदाची बाब आहे,’’ असे मोदी म्हणाले. दिल्लीतही भरपावसात जवळपास ७७,७०० नागरिकांनी योग शिबिरांत भाग घेतला. लाल किल्ल्याजवळील योग शिबिरात सुमारे ५० हजार नागरिक सहभागी झाले होते. कॅनॉट प्लेस येथे १० हजार तर डीडीए पार्कमधील शिबिरात ९ हजार जणांनी योगासने केली.

योगा मोफत आरोग्यविमा

योगा हा मोफत आरोग्यविमा आहे. योगसाधनेसाठी पैशाची गरज नसते. त्याने आरोग्यही मिळते. मन स्थिर करणे हे योगाचे वैशिष्टय़ आहे. देशातील १.२५ कोटी जनेतेने योगसाधना केली तर त्यांना अनेक समस्यांतून वाचविणे शक्य आहे, असे मोदी म्हणाले.

२१ जणांची प्रकृती बिघडली

लखनौमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या योगा शिबिरात सहभागी झालेल्या २१ जणांची प्रकृती बिघडली. ‘‘पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे २१ जणांना डोकेदुखी, सर्दीचा त्रास झाला. शिबिराठिकाणी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या दवाखान्यात त्यातील काहींवर उपचार करण्यात आले. त्यानंतर सर्वाना लोकबंधू रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वाना उपचारानंतर घरी सोडण्यात आले,’’ असे जिल्हाधिकारी कौशलराज शर्मा यांनी सांगितले.

गुजरातमध्ये ३ लाख जणांच्या सहभागाने विक्रम

अहमदाबाद : योगगुरू रामदेव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली जीएमडीसीच्या मैदानावर सुमारे तीन लाख जणांनी योगासने केली. हा जागतिक विक्रम असल्याचा दावा रामदेव यांनी केला आहे. या वेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल, माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आदी उपस्थित होते. एकाच ठिकाणी तीन लाख जणांनी योगासने केल्याने या विक्रमाची गिनीज बुकात नोंद झाल्याचे रामदेव यांनी सुमारे दीड तासांच्या योगासत्रानंतर सांगितले. याआधी २१ जून २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ३५,९८५ जणांनी राजपथावर योगासने केली होती. तो एक विक्रम बनला होता.

शहांनी शारीरिक वजन घटवले पण राजकीय वजन वाढवले

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी योगा करून शारीरिक वजन घटवले. मात्र त्यांनी राजकीय वजन वाढवले, असे कौतुकोद्गार योगगुरू रामदेव बाबा यांनी काढले. शहा यांचे राजकीय वजन वाढल्याने अनेक जण तणावात असतील, पण त्यांनी योगा करून तणावमुक्त  व्हावे, असे रामदेव म्हणाले.

मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा उपाय

नवी दिल्ली : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा हा महत्त्वाचा उपाय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी बुधवारी केले. मुखर्जी यांनी योगा कार्यक्रमाचे उद्घाटन केले. राष्ट्रपती भवनातील कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दररोज योगासने करण्याचे आवाहन मुखर्जी यांनी केले. या कार्यक्रमात सहभागी होऊन देशवासीयांना प्रेरणा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुखर्जी यांचे आभार मानले.

सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचे शवासन

लखनौ : मंदसौरमध्ये शेतकऱ्यांचा मृत्यू आणि केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशात आणि मध्य प्रदेशात काही शेतकऱ्यांनी ‘शवासन’ केले. लखनौमध्ये मोदींच्या उपस्थितीत योग शिबीर सुरू असताना भारतीय किसान युनियनच्या नावाने शेतकऱ्यांनी लखनौ-बाराबंकी महामार्गावर ‘शवासन’ केले. सरकारच्या धोरणांचा निषेध म्हणून शेकडो शेतकऱ्यांनी शवासन केल्याची माहिती युनियनचे प्रवक्ते अलोक वर्मा यांनी सांगितले.

मध्य प्रदेशच्या मंदसौरमध्ये पोलिसांच्या गोळीबारात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेत्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तीन वर्षांनंतरही सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाले, असे या शेतकऱ्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशात शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘शवासन’ केले. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे काँग्रेस प्रवक्ते पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले. राज्यभरात ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी असे निषेधाचे कार्यक्रम आयोजित केले होते.

  • केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू, वियज गोयल, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल, दिल्लीचे मुख्यमंत्री अरिवंद केजरीवाल, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी लेखी यांनी कॅनॉट प्लेस येथील शिबिरात भाग घेऊन योगासने केली.
  • काही केंद्रीय मंत्रालयांनी आपपल्या परिसरात कर्मचारी-अधिकाऱ्यांनाही योग शिबिरांची सुविधा दिली होती. त्यात अनेक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी भाग घेतला.
  • लंडन, चीनसह इतर देशांतही योग दिन साजरा करण्यात आला. अमेरिकेतील भारतीय वकिलातीने न्यूयॉर्कमध्ये योगासत्र आयोजित केले होते. त्यात अनिवासी भारतीयांनी मोठय़ा संख्येने भाग घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या सोवेतो भागात जवळपास १२०० जणांनी पहिल्यांदाच योगासने केली.