पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ एप्रिलपासून फ्रान्स, जर्मनी आणि कॅनडाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, सामाजिक कार्यक्रमातील सहभाग याबरोबरच मोदी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न करणार आहेत. इतकेच नव्हे तर न्यूयॉर्कमधील मॅडिसन-स्क्वेअरप्रमाणे टोराण्टोमध्येही एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोदी तेथेही हजेरी लावणार आहेत.
या देशांमधून मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक आणण्याचे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही सहभागी होण्याचा मोदी यांचा मानस आहे. फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद, जर्मनीच्या चान्सलर एन्जेला मर्केल आणि कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी चर्चा करणार आहेत. भारताच्या ‘लिंक वेस्ट’ धोरणाचा एक भाग म्हणून हा आठ दिवसांचा दौरा आहे.
मोदी ९ एप्रिल रोजी प्रथम फ्रान्सला जाणार आहेत आणि तेथून १२ एप्रिल रोजी ते जर्मनीला रवाना होणार आहेत. जर्मनीमध्ये ते ‘हॅनोव्हर मेस्से २०१५’ या व्यापार मेळाव्याला हजर राहणार आहेत. यामध्ये जर्मनीसह भारत हा सहभागी देश आहे. मोदी यांचा ‘मेक इन इंडिया’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हॅनोव्हरमध्ये राबविण्याचा भारताचा प्रयत्न आहे. ते बर्लिनलाही भेट देणार आहेत.
त्यानंतर १४ ते १६ एप्रिल या कालावधीत मोदी कॅनडाला भेट देणार आहेत. न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअरप्रमाणे टोराण्टो येथे भारतीयांच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोदी तेथे उपस्थित राहणार आहेत.