पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याने शरीफ यांनी मंगळवारी लष्करप्रमुखांशी चर्चा करून राजकीय तिढा शक्य तितक्या लवकर संपुष्टात आणण्याचे ठरविले. तिढा वाढत चालल्याने पाकिस्तानात राजकीय अस्थिरता येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने सरकारने मागील दरवाजाने निदर्शकांशी संपर्क साधण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे.
पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू इम्रान खान आणि धर्मगुरू ताहीर-ऊल-कादरी यांच्या समर्थकांनी पंतप्रधान शरीफ यांच्या राजनाम्याची मागणी केली असून दिवसेंदिवस ही मागणी जोर धरत असल्याने मंगळवारी शरीफ यांनी लष्करप्रमुख राहील शरीफ यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत एकूण सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा करण्यात आली, देशहितासाठी हा तिढा शक्य तितक्या लवकर सोडविण्याबाबत उभयतांमध्ये मतैक्य झाले, असे पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या बैठकीचा सविस्तर तपशील जाहीर करण्यात आला नसला तरी लष्कराने दोन्ही बाजूच्या सदस्यांना चर्चेद्वारे तिढा सोडविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाने आणि कादरी यांच्या पाकिस्तान अवामी तेहरिक पक्षाने गेल्या १३ दिवसांपासून शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली आहे.