भारताला सातत्याने युद्धाची धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. देशाचे आर्थिक नुकसान इतके वाढले आहे की, इस्लामाबादला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, जागतिक बँकेने पाकिस्तानला चालू खात्याच्या नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी १७ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे १ लाख १० हजार ३०० कोटी रूपयांची गरज असल्याचे म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेची नुकतीच वार्षिक बैठक झाली. पाकिस्तानच्या प्रतिनिधी जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. दुसऱ्या देशांबरोबरील व्यवसायात पाकिस्तान सध्या विपरीत परिस्थितीतून जात आहे. सातत्याने वाढत जाणारा आर्थिक तोटा थांबवला नाही तर अर्थव्यवस्था जोखिमीबाहेर जाऊ शकते, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

जागतिक बँकेच्या मते, यामुळे पाकिस्तानला विदेशी मदतीची गरज भासेल. पुढील आर्थिक वर्षासाठी (२०१८) त्यांच्या जीडीपीच्या ५ ते ६ टक्के हिस्सा हा विदेशातून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून पूर्ण करावा लागेल.

पाकिस्तानच्या प्रतिनिधी मंडळात अर्थ विभागाचे सचिव शाहिद महमूद, स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर तारिक बाजवा, आर्थिक विषयाचे विभागीय सचिव आरिफ अहमद खान सहभागी होते. या प्रतिनिधी मंडळाने आशियाई क्षेत्रासाठी जागतिक बँकेचे उपाध्यक्ष अॅनेट डिक्सन यांच्या नेतृत्वाखालील पथकाची भेट घेतली होती. या बैठकीनंतर जागतिक बँकेने पाकिस्तानला पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि विद्यमान परिस्थितीशी निपटण्यासाठी पाकिस्तानला मदत करणार असल्याचे सांगितले.