मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात उरीमध्ये झालेल्या हल्ल्याचे पुरावे गोळा करण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला अपयश आले आहे. दहशतवाद्यांच्या ‘गाईड्स’विरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेला कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या दोन गाईड्स विरोधातील तपास थांबवला आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील फैजल हुसैन अवान आणि अहमान खुर्शीद यांच्यावर १८ सप्टेंबरमध्ये उरीमधील लष्करी तळावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांची मदत केल्याचा आरोप होता. मात्र या दोघांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेला कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाची फाईल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

उरी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप फैजल हुसैन अवान आणि अहमान खुर्शीद यांच्यावर ठेवण्यात आला होता. मात्र भारतीय लष्कराच्या जबाबाशिवाय या दोघांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे कोणताही सबळ पुरावा नव्हता. त्यामुळे या प्रकरणाचा तपास थांबवण्याची नामुष्की राष्ट्रीय तपास यंत्रणेवर आली आहे. फैजल आणि अहसान यांच्याविरोधात कोणतेही सबळ पुरावे गोळा करण्यात अपयश आल्याने तपास थांबवण्यात आला आहे. त्यामुळे आता हे दोघेही पाकिस्तानात जाऊ शकणार आहेत.

भारत-पाकिस्तान यांच्यामधील संबंध सुधारावेत, यासाठीदेखील या दोघांना मायदेशी पाठवण्याची योजना आहे. या दोघांना पाकिस्तानात पाठवण्याचा दिवस गृह मंत्रालयाकडून निश्चित करण्यात येणार आहे. मागील महिन्यात भारतीय सेनेचे जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानकडून मुक्त करण्यात आले होते. चंदू चव्हाण मागील वर्षी चुकून सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात गेले होते. त्यामुळेच आता फैजल आणि अहसान यांनादेखील त्यांच्या मायदेशी पाठवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणाचा तपास थांबवला असून फाईलदेखील बंद केली आहे, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. फैजल आणि अहसान यांच्याविरोधात कोणतेही पुरावे नाहीत, त्यामुळे त्यांची सुटका करण्यात येत आहे, अशी माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेने क्लोजर रिपोर्टमध्ये दिली आहे. विशेष म्हणजे फैजल आणि अहसान यांनी लष्कराला दिलेल्या सुरुवातीच्या जबाबामध्ये त्यांना जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरने दहशतवाद्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या, अशी माहिती दिली होती.