Nitish Kumar oath taking ceremony Updates:  

लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर राष्ट्रीय जनता दलाशी फारकत घेतल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी आज राजभवनात पुन्हा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी राजभवनात पार पडलेल्या सोहळ्यात नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची, तर सुशीलकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नितीशकुमार हे सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी काल बुधवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या पाठिंब्याने त्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता. आज सकाळी राजभवनात मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. त्याआधी सकाळी नितीशकुमार, सुशीलकुमार मोदी यांच्यासह जे. पी. नड्डा हे राजभवनात पोहोचले. सकाळी १० च्या सुमारास राजभवनात शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. राज्यपाल त्रिपाठी यांनी सुरुवातीला नितीशकुमार यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. त्यानंतर सुशीलकुमार मोदी यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. नितीशकुमार सहाव्यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. त्यांनी शपथ घेतल्यानंतर राजभवनात त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

तत्पूर्वी, राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी नितीशकुमार यांच्या विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले. महात्मा गांधी सेतूजवळ त्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखून धरली होती. दरम्यान, राजदच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजभवन परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली.

UPDATES:

राजभवन परिसरात जमावबंदीचे आदेश

सुशीलकुमार मोदी यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ

नितीशकुमार यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ, सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान

जे. पी. नड्डा शपथविधी सोहळ्याला उपस्थित

नितीशकुमारही राजभवनात पोहोचले

सुशीलकुमार मोदी, जे. पी. नड्डा राजभवनात पोहोचले

राष्ट्रीय जनता दलाच्या कार्यकर्त्यांची नितीशकुमार यांच्याविरोधात निदर्शने

भाजप – जदयूला उद्या बहुमत सिद्ध करावे लागणार

भाजपशी युती केल्यानंतर संयुक्त जनता दलामध्ये फूट

जेडीयू नेते नितीशकुमार आज सकाळी १० वाजता घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ