शरद पवार यांच्या वक्तव्यावर भाजपची प्रतिक्रिया
भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व करण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सर्वात विश्वासार्ह व्यक्ती असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते. भाजपने त्याची खिल्ली उडवली आहे. पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पवारांनी काँग्रेस सोडली होती. मात्र त्यांचे स्वप्न वास्तवात उतरले नाही हे लक्षात घ्यावे असा टोला भाजप प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी लगावला आहे.
पवार काहीही कारण नसताना नितीशकुमारांची महत्त्वाकांक्षा वाढवत आहेत, अशी टीका हुसेन यांनी केली. एका मुलाखतीदरम्यान पवारांनी भाजपविरोधात नितीशकुमार विश्वासार्ह चेहरा असल्याचे प्रमाणपत्र दिले होते. शरद पवार व नितीशकुमार यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होणार नाही, अशी टीका भाजपने केली आहे. लोकसभेत संयुक्त जनता दलाचे केवळ दोन सदस्य आहेत हे नितीशकुमारांनी लक्षात ठेवावे. लोकशाहीत महत्त्वाकांक्षा असणे गैर नाही मात्र वास्तवाचे भान हवे याची आठवण शहानवाझ हुसेन यांनी करून दिली.
नितीशकुमारांच्या पक्षाचा पूर्ण बिहारमध्येही प्रभाव नाही तर राष्ट्रीय पातळीवरील गोष्ट दूरच आहे. भाजपचेही एकेकाळी लोकसभेत दोन सदस्य होते. मात्र नंतर कठोर मेहनतीने १९९६मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले होते. त्याचप्रमाणे नितीशकुमारांना काम करावे लागेल असा सल्ला शहानवाझ यांनी
दिला. राहुल गांधी, मुलायमसिंह यादव यांच्या सारख्या नेत्यांनाही महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे त्यांच्याशी नितीशकुमार यांना स्पर्धा करावी लागेल, असे भाकीतही भाजपने वर्तवले आहे.