लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवामुळे नऊ महिन्यांपूर्वी पायउतार झालेले आणि नंतर आपले वारसदार जितनराम मांझी यांच्यासोबत सत्तासंघर्षांचा सामना करणारे जनता दल (संयुक्त)चे नेते नितीशकुमार यांनी रविवारी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा शपथ घेतली. त्यांच्यासोबत २२ मंत्र्यांनीही शपथ घेतली. नितीश हे लालूप्रसाद यादव यांच्या पाठिंब्याने पदारूढ झालेले असल्यामुळे ‘जंगल राज-२’ सुरू झाले असल्याची टीका भाजपने केली आहे.
राजभवनात सायंकाळी झालेल्या शानदार समारंभात राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी नितीशकुमार यांना गोपनीयता व पदभाराची  शपथ दिली. या वेळी ३ महिलांसह २२ मंत्र्यांनीही शपथ घेतली.
या २२ पैकी २० मंत्र्यांनी मांझी सरकारमधून राजीनामा दिला होता, तर पी.के. साही व राजीव रंजन सिंग या दोघांना मांझी यांनी काढून टाकले होते. पक्षनेतृत्वाचा आदेश धुडकावून लावून, कुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्यास नकार देणारे मांझीदेखील शपथविधी समारंभाला हजर होते.
माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, ममता बॅनर्जी (प. बंगाल), अखिलेश यादव (उ.प्र.), तरुण गोगोई (आसाम) हे मुख्यमंत्री, भारतीय लोकदलाचे नेते अभय चौटाला हे या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये जनता दल (यू)चा जबरदस्त पराभव झाल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आणि आमदारांचा विरोध असतानाही ६३ वर्षांचे नितीशकुमार यांनी १७ मे २०१४ रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
भाजपने जद(यू) मधील या मतभेदांचा लाभ उठवत मांझी यांना पाठिंबा दिला; परंतु मांझी यांनी विश्वासदर्शक ठरावापूर्वीच राजीनामा दिल्यामुळे सभागृहात बहुमताची परीक्षा होऊ शकली नाही.
भाजपने नितीशकुमार यांच्या पदग्रहणावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून, लालूप्रसाद यांच्या सोबतीने ‘जंगल राज’चा दुसरा भाग सुरू झाल्याचे म्हटले आहे. याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र नितीश यांचे ट्विटरवर अभिनंदन केले आहे.